मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मालिकेच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी घराघरांत पोहोचतात. या कलाकारांना मालिकेमुळे लोकप्रियता मिळते. सध्या अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. अनेक नवनवीन चेहरे मालिकांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहेत. मालिकांच्या या स्पर्धेत काही मालिका अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. (Aishwarya Narkar On Bts)
अशातच एक प्रेक्षकांची आवडती मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. आगळ वेगळं कथानक असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेच्या यादीत अग्रस्थानी आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासूनच मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांनी प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. नेत्राला दिसणारा भूतकाळ आणि त्यानुसार घडणाऱ्या भविष्यकाळातील घटना या प्रेक्षकांना पाहायला रंजक वाटतात.
ही कलाकार मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटावं म्हणून तसेच चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात. ऊन, वारा, पाऊस याची कसलीच पर्वा न करता ते चित्रीकरण करतात. अशातच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यांत एका सीन दरम्यान घेण्यात येणारी मेहनत पाहायला मिळतेय.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीचा उत्साह तरुणाईला लाजवेल असा आहे. या व्हिडिओमध्ये सीन शूट करताना त्या एका खड्ड्यात कोसळताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवरून त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “नाटक आता सुरु झालं आहे, रुपालीबरोबर नेमकं काय घडतंय यांचा अंदाज बांधा. आणि शेवट नक्की पाहा.” ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.