Satvya Mulichi Satavi Mulgi : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या कथानकात मोठे बदल होणार आहे. नेत्राच्या मदतीला देवी आई धावून येणार आहे. देवी आईने दिलेल्या शस्त्रातून विरोचकाचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच आता विरोचकाचा मृत्यू होणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. नेत्राला प्रसुतीकळा सुरू झाल्या आहेत. अद्वैत तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्या कारमधून नेत असतो. मात्र, त्याच दरम्यान, त्याची कार बंद पडते. त्यामुळे तो चारचाकी हातगाडीवरून तो नेत्राला रुग्णालयात नेण्यासाठी धडपडत असतो. (Satvya Mulichi Satavi Mulgi new promo)
प्रसुतीकळा सुरु झाल्यामुळे नेत्राची स्थिती पाहवत नाही. नेत्राच्या काळजीने अद्वैत अगदी कासावीस होतो आणि देवी आईला हाक मारतो. तो भर पावसात हातगाडीवरुन तिला घेऊन जाताना दाखवले आहे, तेवढ्यात त्या गाडीचे एक चाक निखळते. अद्वैत मदतीसाठी हाक मारतो, तेव्हा एक महिला त्याच्या मदतीला धावून येते. ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती सारंगधर आहे. यापुढे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, नेत्रा देवीच्या मंदिरात जुळ्यांना जन्म देते. नेत्रा-अद्वैतच्या मदतीला धावून आलेली महिला स्वत: देवी आई असते.
पुढे देवी आई नेत्राला म्हणते की, “अजून युद्धाचा अंत झालेला नाही”. मग देवीआई नेत्राच्या हातात एक हत्यार देते आणि म्हणते की, “विरोचकाचा वध कर आणि त्याच्या रक्ताने मला अभिषेक घाल”. त्यावेळी विरोचक म्हणजेच रुपाली तिथे येतो आणि नेत्रा तिच्यावर हत्यार उगारते. त्यामुळे आता देवी आईच्या आशीर्वादानंतर नेत्रा विरोचकाचा वध करणार का, मालिकेत आणखी कोणते नवीन ट्वीस्ट येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मालिकेत विरोचकाच्या अंतावर या मालिकेचे कथानक अवलंबून होते. त्यामुळे आता शेवटी विरोचकाचा अंत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मालिकेत देवी आईच्या भूमिकेत अदिती सारंगधर दिसणार आहे. अदिती सारंगधर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आदितीने या आधी ‘लक्ष्य’ मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.