झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेलेकाही दिवस प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाने व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अजूनही खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर नेत्रा-अद्वैतचा प्रवासही यातून पाहायला मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.
मालिकेत काही दिवसांपूर्वी अस्तिकाची एंट्री झाली आहे. त्यानंतर या मालिकेला वेगळेच वळण लागले. सुरुची अडारकरने या मालिकेत अस्तिकाची भूमिका साकारली असून तिच्याकडे नागमणी असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशातच आता आस्तिकाला रुपालीचे सत्य माहित झाले असून तिने हे सत्य अद्वैतलादेखील सांगितले आहे. मात्र आता अस्तिका अद्वैतच्याच प्रेमात पडली आहे. मालिकेत अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये “अस्तिका माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही करु शकत नाही. मला माझ्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. पण माझ्या जखमांवर कुणी तरी फुंकर मारल्यासारखे मला वाटत आहे. तुमच्या सहवासात मला खूप बरं वाटतं. तू सोबत असलास की, मी सगळं विसरुन जाते. तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो. माझ्या मनावरची जखम घेऊन मी इतके युगे प्रवास करत आहे. पण आज माझा एकांत संपला आहे. आता आपण कायमचे एक होणार आहोत”.
२०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या रहस्यमय कथानकाने साऱ्यांना भुरळ घातली आहे. मालिकेत तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, राहुल मेहेंदळे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरत आहे. अशातच नुकताच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आणि यानिमित्ताने सेटवर जंगी सेलिब्रेशनही करण्यात आले होते.