लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत संकर्षण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तो एक उत्तम लेखक, कवी असल्याचे आपण जाणतोच. पण तो एक उत्तम वडीलदेखील आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेक पोस्टद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अशातच संकर्षणने नुकताच इन्स्टाग्रामद्वारे मुलांबरोबर वेळ घालवतानाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याची मुलं आज सुट्टीनिमित्त कशी खुश आहेत याची खास झलक दाखवली आहे. त्याचबरोबर या खास व्हिडीओबरोबरच त्याने त्याच्या लहानपणीच्या खास आठवणींना उजाळादेखील दिला आहे. संकर्षणचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संकर्षणने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्याने असं म्हटलं आहे की, “मी यांच्या (सर्वज्ञ, स्रग्वी) इतका लहान होतो तेव्हा रविवार फार वेगळा होता. मस्तं होता. संपूर्ण आठवडा अंगावर घेतलेली धूळ आई किंवा आजी ‘लिरील’ साबणाने घासून घासून काढायची. ते डोळ्यात गेलं की, बोंबाबोंब. मग रांगोळी पाहात पाहात चहाच्या कपात दूध, बोर्नव्हीटा आणि बिस्किटांचा लगदा करून खायचा.”
यापुढे त्याने “मग ‘जंगल जंगल बात चलीं है पता चला है’ मोगली हे छायागीत ऐकायचं, मग दुपारी जेवण झाल्यावर रात्रीपेक्षाही गाढ झोपायचं. पुन्हा मग ४ वा. सह्याद्रीवर मराठी ‘बनवा बनवी’ चित्रपट पाहायचा आणि संध्याकाळनंतरचा सग्गळा वेळ उद्या शाळा आहे ह्या दुःखात जायचा.” असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण आपल्या मुलांबरोबर छान संवाद साधताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओखाली “दोघे गोड आहेत, मुलगी अगदी तुमची कॉपी आहे, दोघेही फारच गोड आहेत, तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा, गोड गोड मुलं, गोड गोड गप्पा आणि खरंच तेव्हाचा रविवार असाच असायचा, दोन्ही बछड्यांना खूप खूप प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत संकर्षण व त्याच्या मुलांचे कौतुक केले आहे.