४ वर्षांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर आलेली ‘सुखांच्या सरीने हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षकगीतदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अनु व सिद्धार्थ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस हे दोघे तर प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले होते.
‘मन हे बावरे’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियाद्वारे नेहमीच फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. शशांक व मृणाल यांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्गदेखील आहे. मालिकेतील कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन कधीकधी मालिकेच्या काही आठवणी किंवा किस्सेदेखील शेअर करत असतात. अशातच आता शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे आणि या फोटोचं निमित्तदेखील तितकंच खास आहे.
शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मृणालबरोबरचे काही खास फोटो शेअर करत “‘हे मन बावरे’ ही मालिका संपून ४ वर्ष झाली. पण आजही “ही मालिका अजूनही परत परत बघतो” अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते.” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने “मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का?” असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहे. तसेच त्याने या फोटोखाली सिद्धार्थ-अनू भेटले असं म्हणत मृणालचे भारतात स्वागत केले आहे. या मालिकेतील अनू अर्थात अभिनेत्री मृणाल दुसाणीस आई झाल्यानंतर मृणालने काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा – उन्हाळ्यामध्ये फ्रिजमधील थंड पाणी पिणं ठरत आहे धोकादायक, शरीरही होत आहे कमकुवत
‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ ही मृणालची शेवटची मालिका. या मालिकेनंतर मृणाल छोट्या पडद्यावर दिसलीच नाही. अशातच मृणाल नुकतीच भारतात परतली आहे. त्यामुळे शशांकने शेअर केलेल्या या फोटोखाली अनेक चाहत्यांनी “ही जोडी पुन्हा बघायला आवडेल. आमची आवडती मालिका आहे. कृपया या मालिकेचा दूसरा भाग घेऊन या, आम्हाला ही मालिका पुन्हा बघायला आवडेल” अशा कमेंट्स करत या फोटोला प्रतिसाद दिला आहे.