यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी काहीतरी नवीन गोष्टी घेत हा सण साजरा केला. अशातच अभिनेत्री रुचिरा जाधव हिनेदेखील गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर घेतलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नवीन घर खरेदी करत तिने आपल्या आई-वडिलांना गोड सरप्राइज दिलं आहे.
अभिनेत्रीने तिच्या या नवीन घराचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. या फोटोमध्ये रुचिरासह तिचे आई-वडील व बहिणही पाहायला मिळत आहे. हे खास फोटो शेअर करत तिने तिच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या जीवनात फक्त काही छोट्या गोष्टी आहेत, ज्या माझ्या आत्म्याला आनंद व समाधान देतात. त्यात माझ्या पालकांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि मी करत असलेले काम हे सर्वात आधी आहे.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या स्वप्नाच्या जवळ एक पाऊल टाकण्याच्या या प्रवासात मला असं जाणवलं की, घर बनवणे हेदेखील माझ्यासाठी तितकेच आवश्यक आहे. ही अंतिम पायरी नाही, पण हे खरंच पहिलं आहे आणि आपले प्रत्येक पाऊल मोजले जाते. घर जिथे सुख आहे. घर म्हणजे जिथे माझी माणसं हसत आहेत”. दरम्यान रुचिराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या घराच्या दारावरील नावाच्या पाटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. यावर तिने तिच्या आई-वडिलांचे नाव लिहिले आहे. त्यामुळे तिच्या या कृतीसाठी सर्वच जण तिचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, रुचिराची नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत एंट्री झाली आहे. अर्जुनच्या या खास मैत्रिणीच्या भूमिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झळकली आहे. रुचिराच्या येण्याने मालिकेला रंजक वळण आले आहे. याआधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतदेखील रुचिराने अशाच धाटणीची भूमिका साकारलेली पहायला मिळाली होती.