सध्या अनेक मराठी नाटकांचे परदेश दौरे होताना पाहायला मिळत आहेत. परदेशातही मराठी कलाकारांना प्रेक्षकांचं तितकंच भरभरुन प्रेम मिळतं. सातासमुद्रापलिकडेही आपले चाहते आहेत हे पाहून कलाकार भारावून जातात. सध्या रंगभूमीवर ज्या नाटकाची जोरदार चर्चा आहे, त्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरु आहे. नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. त्या सर्व प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या नाटकाच्या निमिताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अमेरिकेत आहे. नाटकातील प्रयोगादरम्यानचे अनेक फोटोज तो शेअर करताना दिसतो. असाच एक फोटो नुकताच त्याने शेअर केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. (Sankarshan Karhade meet a fan after 12 years)
‘नियम व अटी लागू’ नाटकाचा प्रयोग नुकताच अमेरिकेतील डॅल्लस येथे झाला. नाटकाच्या प्रयोगानंतर संकर्षणला भेटायला एक चाहती आली होती. विशेष म्हणजे, त्या चाहतीसह त्याने ‘आम्ही सारे खवय्ये’चा पहिला भाग शूट केला होता. तब्बल १२ वर्षांनी भेटायला आलेल्या चाहतीला पाहून अभिनेता भारावून गेला. यावेळी त्याने त्या चाहतीबरोबरचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत पोस्टदेखील लिहिली आहे.
हे देखील पाहा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नात भूवनेश्वरीचीच हवा, भरजरी साडी, दागिन्यांनी वेधलं लक्ष
हा फोटो शेअर करत संकर्षण म्हणाला, “माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…” आज अमेरिकेतील डॅल्लस येथे आमच्या नाटकाचा प्रयोग जोरदार झाला. प्रयोगानंतर एक काकु काठी टेकवत भेटायला आल्या. त्यांचं नाव उत्तरा दिवेकर, या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी २०११ साली माझा ‘आम्ही सारे खवय्ये’चा पहिला भाग शूट केला होता. योगायोगाने त्या पर्वाचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”. आज मला त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलाचं नाटक पाहायला आले.” इतकं भरून आलं मला… कलाकाराला काय हवंय..? तर हेच.”
हे देखील पाहा – सेन्सॉर बोर्डाने लाखो रुपयांची लाच घेतल्याचा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा आरोप, एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हणाला…
“आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय. ‘खवय्ये’मुळे मला अनेक कुटुंब भेटली, अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक आई भेटल्यात ज्या जगभरात कुठेही राहत असल्या, तरी माझी वाट पाहतात. आणि आज ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या निमित्ताने भेट झाली.”, असं तो या पोस्टमध्ये म्हणाला. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना त्याचा ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील कलाकारांसह चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.