बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व चित्रपटातील भव्यपणा ही समीकरण अगदी ठरलेलंच आहे. संजय लीला भन्साळी यांनी आजवर त्यांच्या अनेक चित्रपटातून वेगवेगळे विषय मांडले आहेत. संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘हम दिले दे चुके सनम’, ‘गंगुबाई काठियावाडी’सारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशातच त्यांच्या आणखी एका नवीन सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.
संजय लीला भन्साळी आता त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ या सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करत आहे. त्यामुळे या सीरिजबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतीच या बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी : द डायमंड बझार’ची पहिली झलक चाहत्यांसमोर आली आहे. या सीरिजमध्ये ‘हिरामंडी’ नावाचे एक ठिकाण दाखवण्यात येणार आहे, जे वेश्यांचे क्षेत्र होते आणि ज्यावर त्या राण्यांप्रमाणे राज्य करत होत्या. याचा एक व्हिडीओ समोर आला असून यात या सीरिजमधील अभिनेत्रींचा लूकही पहायला मिळत आहे.
‘हीरामंडी’ ही पाकिस्तानातील लाहोरमधील एक वेश्यावस्ती आहे. ज्याला ‘शाही मोहल्ला’ असंही म्हटलं जात होतं. फाळणीपूर्वी या वेश्यावस्तीची देशभरात चर्चा होती. १९४०च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज असून यात प्रेम, राजकारण फसवणूक याविषयी भाष्य केलं जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या सीरिजची पहिली झलक समोर आली आहे. पण अद्याप सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच ही सीरिज प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता लागली आहे.