Ajinkya Nanaware And Shivani Surve Engagement : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी जिव्हाळ्याचा विषय. लग्न म्हटलं की, प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्यात लग्न हे जर एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं असेल तर त्याची उत्सुकता काही औरच असते. अशीच उत्सुकता लागून राहिलेलं मनोरंजन सृष्टीतलं क्युट कपल म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरे व अभिनेत्री शिवानी सुर्वे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या आणि अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अजिंक्य व शिवानी यांनी नुकताच साखरपुडा उरकला आहे.
काल (३१ जानेवारी) रोजी दोघांनी त्यांचा साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. ‘अखेर बंधनात’ असं म्हणत अभिनेत्रीने त्यांच्या या साखरपुड्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंद्वारे त्यांचा साखरपुड्याचा हटके लूक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – एकत्र काम करण्याबाबत निवेदिता सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आम्हा दोघांना…”
साखरपुड्याच्या खास लूकसाठी शिवानीने फिकट जांभळ्या रंगाची, सुंदर नक्षीकाम असलेली साडी परिधान केली होती. तर या हटके लूकमध्ये तिच्या हातातली हिरव्या बांगड्यांच्या चुड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तर क्रीम रंगाचे मिश्रण असलेला कुर्ता व त्यावर भरजरी, फुलांचे नक्षीकाम असलेला जॅकेट, त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा, मोजडी बूट व डोक्यावर टोपी असा खास लूक केला होता. शिवानी-अजिंक्य ही जोडी या खास लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आणखी वाचा – उर्वशी रौतेलाचं अनुकरण केल्याची चर्चा होताच मनारा चोप्रा सावध, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल, म्हणाले, “इथेही…”
शिवानी-अजिंक्यने शेअर केलेल्या या खास फोटोंवर मराठी मनोरंजन सृष्टीतील स्वप्नील जोशी, सुयश टिळक, सुव्रत जोशी, ऋतुजा बागवे, पर्ण पेठे, अनघा अतुल आदी कलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अनेक चाहते मंडळींनीदेखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, शिवानी-अजिंक्य यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नुकताच त्यांनी साखरपुडादेखील उरकला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकतादेखील लागून राहिली आहे.