‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. विविध विषयांवर आधारित स्किट्स आणि त्यावर होणारे विनोदी सादरीकरण हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम अगदी लॉकडाऊनसारख्या कठीण काळात मनोरंजनाचे एक उत्तम साधन बनले होते. यामागे हास्यजत्रेतील कलाकारांसह लेखक-दिग्दर्शक जोडगोळी सचिन मोटे व सचिन गोस्वामी आणि पडद्यामागील अन्य तंत्रज्ञाचा मोलाचा वाटा आहे. (Maharashtrachi Hasyajatra)
गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हास्यजत्रेतील कलाकारांनी काही महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यावेळी अनेक कलाकारांनी अमेरिका व कॅनडाचा दौरा करत तिथल्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. त्यांच्या सर्व शोजना प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. परदेशातील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर हास्यजत्रेतील कलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. यानिमित्त हास्यजत्रेच्या सर्व कलाकारांनी ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. त्यावेळी अनेक कलाकारांनी परदेशातील त्यांचे अनेक किस्से शेअर केले आहे.
‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना अभिनेता समीर चौघुलेने अमेरिकेत घडलेला एक किस्सा सांगितला. ज्यात तिथे कार्यक्रमातील कलाकारांना भेटायला एक चाहती आली होती, पण ती काही न बोलता त्यांना भेटून निघून गेली. हा किस्सा सांगताना समीर भावुक झाला होता. समीर चौघुले म्हणाला, “हास्यजत्रेच्या सॅन होजेच्या शोमध्ये आम्हा कलाकारांना भेटायला एक बाई आली होती. काही माहित नाही, पण ती बाई फक्त ढसाढसा रडत होती. स्टेजवर आली, तिने आम्हा सगळ्यांना मिठी मारली, फोटो काढला आणि काहीच न बोलता तिथून निघून गेली. हे सगळं जेव्हा घडलं, तेव्हा आम्ही यावर निःशब्द झालो होतो. काय दुःख असतील त्या बिचारीला, ते माहित नाही. मग तिला शांत हो, पाणी घे असं मी विचारलं, मात्र ती काही नाही बोलली. केवळ आम्हाला नमस्कार केला, आमच्यासोबत फोटो काढला आणि तिथून निघून गेली.”
“त्या क्षणानंतर आम्ही सर्व शांत झालो, आणि सगळ्यांना सांगितलं की आपण हा कार्यक्रम अजून जास्त गांभीर्याने करण्याची गरज आहे. कारण, आपण लोकांना त्यांच्या आयुष्यात इतपत साथ देतोय. तिथली काही लोक आम्हाला एअरपोर्टवर भेटले. ते म्हणाले की, कोरोनामुळे आमच्या घरातील तीन-चार सदस्य आम्हाला सोडून गेली. पण ह्या कार्यक्रमामुळे आम्ही आज तरलेलो आहोत. हे ऐकून आम्हा सगळ्यांना खूप समाधान वाटलं की, आपला शो कळत-नकळत का होईना, पण आपल्या लोकांचं आयुष्य यामुळे बदलत आहे.”, असं समीर म्हणाला.
अभिनेता समीर चौघुलेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये झळकला आहे. शिवाय, त्याने अनेक चित्रपट व मालिकांमध्येही काम केलेले आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे नेहमीच कौतुक होत असते. शिवाय, त्याच्या स्किट्समधील इतर कलाकारांचाही यात मोलाची साथ मिळते. कलाकारांच्या उत्तम सहयोगामुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता ठरला आहे. (Samir Choughule share a Fan Moment in Hasyajatra USA Tour)