शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बरंच गाजलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबियांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या सगळ्या प्रकरणात एक नाव बरंच चर्चेत आलं ते म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. समीर यांनी या प्रकरणामध्ये कारवाई केली होती. दरम्यान त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र ते डगमगले नाहीत. समीर यांची पत्नी क्रांती रेडकरही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. सततच्या होणाऱ्या आरोपांबाबत समीर यांनी अवधुत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात भाष्य केलं.
समीर यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अवधूतने त्यांना त्यांच्या बारविषयी विचारलं. “अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत असताना तुमचा स्वतःचा बियर बार होता? अशा बातम्या आल्या”. असं अवधुत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारलं. यावर त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं. तसेच सततचे होणारे आरोप, चर्चा याची बोलती बंद केली. समीर यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांची बाजू, मत मांडत स्वतःच्या बारबाबत खरं काय ते सांगितलं.
ते म्हणाले, “बार म्हणजे ते काय डान्स बार वगैरे आहे का? बार म्हणजे ते एक साधं रेस्टॉरंट आहे. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवण व नाश्तासह इतर गोष्टी दिल्या जात असतील तर तुम्ही त्याला बार म्हणणार का?. ते फक्त कौटुंबिक बार आणि रेस्टॉरंट आहे”. समीर इथवरच थांबले नाही तर त्यांनी सततच्या होणाऱ्या चर्चांबाबत रागही व्यक्त केला. तसेच टीका करणाऱ्यांना अनेक प्रश्नही विचारले.
आणखी वाचा – सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”
ते पुढे म्हणाले, “खाकी वर्दीत असलेल्या व्यक्तीने व्यवसाय करु नये असं कुठे कोणी म्हटलं आहे किंवा लिहून ठेवलं आहे का?”. समीर यांनी अगदी खुलेपणाने याबाबत भाष्य केलं. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या समीर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अगदी बरोबर दिलं उत्तर असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी समीर यांचा बार आहे याबाबत त्यांच्यावर टीका केली आहे.