सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर व्यक्त होणं अनेक कलाकार मंडळींना आवडतं. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. एखाद्या सामाजिक मुद्द्यावरही ती स्पष्टपणे आपलं मत मांडते. इतकंच नव्हे तर खासगी आयुष्यामध्येही एखादी घटना घडली तर हेमांगी ते चाहत्यांपर्यंत पोहोचवते. याआधी तर तिने महिलांची व्यथा मांडणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर केल्या. आताही तिने महिलांविषयीच शेअर केलेली पोस्ट सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मंदिरात जावं की नाही याबाबत एक लेख तिने फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
हेमांगीने मैत्रियी बांदेकर या फेसबुक युजरने मासिका पाळीविषयी लिहिलेला लेख हेमांगीने शेअर केला. स्त्रियांनी मासिक पाळी दरम्यान देवळात का जाऊ नये? त्यामागे देण्यात येणारी वैज्ञानिक कारणं याआधारावर हा लेख लिहिलण्यात आला आहे. मासिक पाळीदरम्यान देवळात नसेल जायचं तर नका जाऊ. पण किमान यामागे काही वैज्ञानिक कारण आहे असं तरी नका म्हणू असं या लेखामध्ये म्हटलं आहे.
हेमांगीने हा लेख शेअर करताना म्हटलं की, “खूप महत्त्वाचं. मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं जा… नाही वाटत? नका जाऊ. पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका”. हेमांगीने ही पोस्ट शेअर करताना अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच हेमांगीने ट्रोल करणाऱ्यांना कमेंटद्वारे सडेतोड उत्तरही दिलं आहे.
आणखी वाचा – Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर
“हे सगळं ज्ञान बाकी धर्माच्या बाबतीत कुठे जात हो” अशी कमेंट एका युजरने केली. यावर हेमांगीने रिप्लाय केला. ती म्हणाली, “आपल्या घरात काय चाललंय ते आधी पाहावं. दुरुस्त करावं. मग दुसऱ्याच्या घरात पाहावं. आपलं घर सोडून दुसऱ्याचं घर दुरुस्त करण्याच्या नादात पडू नये. माझा आपला सरळ साधा हिशोब आहे”. तर काहींनी हेमांगीच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. आम्हाला तुझे विचार खूप आवडतात, तुमचं सडेतोड लिखाण आवडतं अशा अनेक कमेंट करण्यात आल्या आहेत.