सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. त्यांचं कुटुंबिय तर पूर्णपणे कोलमडून गेलं. देसाईंच्या आत्महत्येनंतर सातत्याने नवनवीन माहिती समोर येत होती. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं तसेच आर्थिक अडचणींमधून त्यांनी आत्महत्या केली अशा विविध चर्चा रंगत होत्या. नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही अस्पष्टच आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत सगळीकडेच चर्चा असताना नितीन देसाईंची मुलगी मानसी देसाईने पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मानसी म्हणाली, “मी मानसी नितीन देसाई. मी माझ्या कुटुंबियांकडून माझं मत सगळ्यांसमोर मांडत आहे. २ ऑगस्ट रोजी माझे बाबा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे त्यांच्याबाबत खूप चुकीची माहिती पसरवण्यात आली”.
“या दुःखद घटनेनंतर त्यांच्यावर कर्ज होतं आणि इतर गोष्टींबाबत चर्चा झाली. त्यांची खरी बाजू आणि त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं? हे आम्ही प्रसार माध्यमांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि आम्ही ८१.३१ कोटी रुपयांचं कर्ज फेब्रुवारी २०२० पर्यंत फेडलं होतं. त्यानंतर करोनाकाळात संपूर्ण जगच थांबलं”.
#WATCH | Today through this press statement I would like to say that my father had no intention to cheat anyone and he was going to make all the payments that he promised. Due to the pandemic, there was no work and the studio was closed. And due to this, he was not able to make… pic.twitter.com/5r898wagH7
— ANI (@ANI) August 5, 2023
पुढे ती म्हणाली, “बॉलिवूडलाही याचा खूप मोठा फटका बसला. बाबांकडे कामं नव्हती म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला. याचमुळे नियमीत कर्जफेड करणं शक्य झालं नाही. त्याच्याआधी कंपनीने आमच्याकडून सहा महिन्याचं आगाऊ पेमेंट मागितलं होतं. तेव्हा माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून ती मागणी पूर्ण केली. मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की, त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे एनडी स्टुडिओ तुम्ही ताब्यात घ्या. तसेच त्यांना न्याय मिळवून द्या”. मानसीला हे सारं बोलताना अश्रू अनावर झाले होते.