बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे ४.५० च्या सुमारास दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि हवेत गोळीबार करून त्यांनी तेथून पळ काढला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. गोळीबार झाला तेव्हा सलमान घरातच होता.
या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू आहे. डीसीपीही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, तेथील स्थानिक लोकांचीही चौकशी केली जात आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Visuals from outside actor Salman Khan's residence in Bandra where two unidentified men opened fire this morning.
— ANI (@ANI) April 14, 2024
Police and forensic team present on the spot. pic.twitter.com/fVXgHzEW0J
आणखी वाचा – उन्हाळ्यामध्ये फ्रिजमधील थंड पाणी पिणं ठरत आहे धोकादायक, शरीरही होत आहे कमकुवत
मार्च २०२३ मध्ये लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारकडून Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोई याने तुरुंगात टाकलेल्या १० जणांच्या यादीत सलमान खान हा सर्वात वरचा असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले होते. १९९८ च्या काळवीट शिकारीच्या घटनेबद्दल बिश्नोई समुदाय संतप्त आहे, ज्याचा संदर्भ देऊन लॉरेन्सने एका टीव्ही मुलाखतीत सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, यापूर्वी २०२२ मध्ये सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला धमकीचा ई-मेल आला होता. याशिवाय कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशातच पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एकच खळबळ उडाली आहे.