Salman Khan Blackbuck Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सतत चर्चेत असलेला दिसतोय. बिष्णोई समाज सलमान खानवर नाराज असल्याचं समोर आलं. वास्तविक, सलमान खानवर काळवीट मारल्याचा आरोप होता. आणि बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो. याच कारणामुळे सलमान खानने त्यांच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, अशी बिष्णोई समाजाची इच्छा होती. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने तर सलमान खानला धमकावले होते. त्याच्या घराबाहेरही गोळ्या झाडण्यात आल्या. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांनी लेकाची बाजू घेत मत मांडलेलं दिसलं.
वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सलीम खान म्हणाले की, “जर सलमानने कोणत्याही प्राण्याला मारले नसेल तर त्याने माफी का मागायची?”. तर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली या प्रकरणावरुन म्हणाली होती की, सलमाननेच तिला काळवीट मारल्याचे सांगितले होते. मात्र, बिश्नोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हते.
या सगळ्या दरम्यान बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले होते, “सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की, सोमी अली माझ्या संपर्कात नाही. दुसरे असे की, कोणी कोणाच्या वतीने माफी मागितली किंवा पूजा केली तर समाज अशी परवानगी देत नाही. गुन्हा करणाऱ्याला माफी मागावी लागते. त्याला पश्चाताप करावा लागतो. माफीचा प्रश्न आहे, आता सलमानच्या वडिलांनी खोटे सांगितले की, सलमानने असे काही केले नाही, त्यामुळे आता सलमानला माफ करता येणार नाही”.
ते पुढे म्हणाले, “खोटे बोलून तुम्ही सुटू शकत नाही. चूक झाली हे सत्य सांगून वाचवता येईल, बाकी कोर्ट केस आहे, ते चालू आहे. आता आम्ही त्यांना माफ देखील करणार नाही कारण हे लोक खोटे बोलत आहेत. आधी पैशाचा आरोप झाला. तो आमचा गुन्हेगार आहे. मी पंतप्रधान, गृहमंत्री व कायदामंत्र्यांना या प्रकरणाची दररोज सुनावणी करुन सलमानला शिक्षा व्हावी, अशी विनंती करतो”.