बऱ्याच कलाकारांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना विशेष आवडतं. ही कलाकार मंडळी एकत्र काम करायला कायमच उत्सुक असतात. अशीच एक एकत्र काम करताना पाहायला आवडणारी जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व सई ताम्हणकर. दोघांनी या आधी बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या चित्रपटांमधून जशी त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला मिळते तशीच त्यांची केमिस्ट्री पडद्यामागेही खरी आहे. (Saie Tamhankar On Marriage)
‘श्रीदेवी प्रसन्न’ हा आगामी सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य अभिनित चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज होत आहे. यानिमित्त सई व सिद्धार्थ माध्यमांना अनेक मुलाखती देत चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान त्यांनी लग्न संस्थेवर आधारित असलेल्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाबाबत बऱ्याच गप्पा मारल्या. अशातच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत “लग्न म्हणजे नेमकं काय” असा प्रश्न सई व सिद्धार्थ या दोघांनाही विचारण्यात आला. लग्न म्हणजे नेमकं काय याबाबत सईने तिचं मत काय आहे याचा उलगडा केला आहे.
लग्नाबाबत सई म्हणाली, “लग्न म्हणजे उलझन. लग्न म्हणजे कोडं असं मला वाटतं. कोणाला ते सोडवता येत तर कोणाला ते सोडवता येत नाही. पण हे गोड कोडं आहे असंही मला वाटतं. लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे आणि खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. लग्न ही संकल्पना मला जितकी मज्जेदार वाटते तितकीच ती भीतीदायकही वाटते” असंही ती म्हणाली.
सईचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असतं. अमेय गोसावीसह सई लग्नबंधनात अडकली होती. मात्र काही कारणास्तव दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सई एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसल्या. सध्या सई निर्माता अनिश जोग याला डेट करत आहे.