Majjacha Adda with Pushkar Jog : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित व वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीसह मराठी ‘बिग बॉस’चीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं सीझन तर बरंच गाजलं. या सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद मिळाला. मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. तर या सीझनमधून नावारुपाला आलेला अभिनेता होता पुष्कर जोग. पुष्करची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच त्याची सई लोकूरबरोबर असणारी मैत्री विशेष गाजली. याचबाबत त्याने आता भाष्य केलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये पुष्कर, सई, मेघा यांचं त्रिकुट विशेष चर्चेत आलं होतं. वेळेप्रसंगी या तिघांमध्ये वादही झाले. पण तिघांची मैत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेषतः पुष्कर-सईचं मैत्रीचं नातं प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. सईला पुष्कर मैत्रीच्या नात्याने आवडायचा. यावरुन बऱ्याच चर्चाही रंगल्या. त्याचदरम्यान सईबरोबरच्या नात्यावर पुष्करला सोशल मीडियाद्वारे बरंच ट्रोल करण्यात आलं. आता तर या दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याचं चित्र दिसत आहे.
पुष्करने ‘मज्जाचा अड्डा’या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी पुष्करला सईविषयी विचारण्यात आलं. यावेळी तिने लग्नालाही बोलावलं नसल्याचं सांगितलं. शिवाय सईच्या गरोदरपणाची बातमी ऐकताच पुष्करला आनंद झाला. त्याने तिला अभिनंदनाचा मॅसेजही केला. पण सईने त्याला रिप्लाय करणंही टाळलं. यावरुनच दोघांमधील मैत्री कमी झाली असल्याचं दिसत आहे.
रॅपिड फायरदरम्यान पुष्करला काही प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान काही कलाकारांची नावं घेण्यात आली. नावं घेण्यात येणाऱ्या कलाकारांना काय प्रश्न विचारशील? असा टास्क पुष्करला देण्यात आला. “सई लोकूरला काय विचारशील?” असं विचारताच पुष्करने अगदी दिलखुलास उत्तर दिलं. पुष्कर म्हणाला, “तू मला लग्नालाही बोलावलं नाही. प्रग्नेंसीची बातमी कळताच मी तुला अभिनंदन केलं. पण मला त्याचाही रिप्लाय केला नाही.” पुष्करने अगदी दिलखुलासपणे सईविषयी त्याचं मत मांडलं.