गेल्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घर घेत आपल्या स्वप्नांची पूर्तता केली. गेल्या वर्षात प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, धनश्री काडगांवकर, केतकी माटेगांवकर, ऋतुजा बागवे, मयूरी वाघ, अक्षय केळकर, प्रसाद खांडेकर, पृथ्विक प्रताप आदी कलाकारांसह प्रसाद ओक यांनीही नुकतेच नवीन घर घेतले. कलाकारांनी त्यांच्या नवीन घराचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली होती. अशातच यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. (Madhuri Pawar On Instagram)
आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री व नृत्यांगना म्हणजे माधुरी पवार. अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ खास शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या चाहत्यांबरोबर नवीन घराबद्दलची गुडन्यूज शेअर केली आहे.
माधुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने तिच्या अलिशान घराची खास झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या नवीन घरानिमित्त केलेल्या वास्तुशांतीची पूजादेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. माधुरीने हा खास व्हिडीओ शेअर करत त्याखाली “नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच यापुढे तिने ‘नवीन घर’ असा एक खास हॅशटॅगही दिला आहे.
दरम्यान, माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पूजेनिमित्त तिच्या कुटुंबियांनीदेखील खास हजेरी लावले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या या नवीन घराच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी तिला नवीन घरानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.