Sagar Karande On Online Fraud Case : ऑनलाईन फ्रॉड संदर्भात अनेक गोष्टी सतत कानावर येत असतात. ऑनलाईन घोटाळ्यात अनेकजण अडकतात. सोशल मीडियाचा वाढता वापर या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सध्या हा प्रकार इतका वाढला आहे की अगदी रोज या बातम्या कानावर येतात. अशातच आज सकाळी एका अभिनेत्यासह ऑनलाईन फ्रॉड झाला असल्याची बातमी समोर आली. सर्वसामान्य, गोर-गरिबांबाबत ही गोष्ट कानावर नेहमीच येते मात्र यावेळी आलेल्या या वेगळ्याच बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठमोळा अभिनेता सागर कारंडे या ऑनलाईन फ्रॉडमध्ये अडकला आणि लाखोंची रक्कम गमावली. ही बातमी खरी की खोटी हा मोठा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर दिसू लागला. आणि अर्थात नेमकं सत्य काय याबाबत सागर कारंडेने भाष्यही केलं.
ऑनलाईन फसवणुकीची व्हायरल बातमी नेमकी काय आहे?
सागराला सायबर चोरांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या बातम्या शुक्रवारी सकाळी समोर आल्या. एक छोटी चूक त्याला महागात पडली आणि ६१ लाखांहून अधिकची रक्कम त्याला गमवावी लागली असल्याचा दावा करण्यात आला. अवघ्या दिडशे रुपयांसाठी सागरला हा लाखो रुपयांचा फटका बसला. इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाइक करुन दीडशे रुपये मिळवा, या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेंची सायबर भामट्यांनी तब्बल ६१ लाख ८३ हजार रुपयांना फसवणूक केली.
अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरुन सदर लाईक करा आणि पैसे कमवा ही जाहिरात आली आणि या जाहिरात तो बळी पडला. प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील, असा दावा बातम्यांमध्ये करण्यात आला. सुरुवातीला काही रक्कम भरुन हे काम करता येईल असे सांगण्यात आले तेव्हा त्याने थोडीफार रक्कमही भरली आणि त्याचा मोबदलाही त्याला मिळाला. त्यानंतर त्याने वॉलेटमध्ये सुमारे २७ लाख रुपये गुंतवून हे काम स्वीकारले. वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न करु नये टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असे सांगण्यात आले.
मोबदला आपल्या वॉलेटमध्ये जमा होतोय हे लक्षात येताच त्याने १९ लाख रुपये व त्यावर ३० टक्के कर असे एकूण ६१ लाख ८३ हजार रुपये भरल्याचा दावा करण्यात आला आहे. या सायबर भामट्यांनी सागरने भरलेला ३० टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगत त्याला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. मात्र हा प्रकार सागरला संशयास्पद वाटला आणि त्याच्या मनात शंका निर्माण झाली. आपली फसवणूक केली जातेय असं वाटल्यानंतर सागरने सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला. सागरच्या नावे व्हायरल झालेली बातमी नक्की कोणत्या सागर कारंडेची आहे हे पाहणंही तितकंच आवश्यक आहे, कारण सध्या सागर कारंडे या नावाने व्हायरल होणारी बातमी अभिनेता सागर कारंडेची नसून भलत्याच कोणा व्यक्तीची आहे. याबाबत स्वतः अभिनेत्यानेच संवाद साधत ‘तो मी नव्हे’ असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘पंचायत’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोने वेधलं लक्ष, कथा काय वळण घेणार?
ऑनलाईन फसवणुकीच्या बातमीवर काय म्हणाला अभिनेता सागर कारंडे?
ही बातमी अनेक प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखी पसरली. आणि अखेर सत्य काय याबाबत सागरने एका वाहिनीशी संवाद साधत सांगितलं. सागर कारंडेने ‘झी 24 तास’लाशी साधलेल्या संवादात म्हटलं की, “ज्या सागर कारंडेबरोबर हा सारा प्रकार घडला तो सागर कारंडे मी नाहीच”, असं सांगितलं. तसेच खोट्या बातम्या देणाऱ्यांना तो नोटीस पाठवणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. म्हणजेच दुसऱ्याच एका सागर कारंडेच्या नावाने ही बातमी व्हायरल झाली आणि याचा अभिनेत्याला नसता मनस्ताप सहन करावा लागला.