एव्हरग्रीन चित्रपटांच्या यादीत बरेच चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. यांत एका चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तो चित्रपट म्हणजे २००४ साली आलेला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट. सचिन पिळगांवकर यांच्या या चित्रपटाने जवळपास दोन दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटाचे संवाद, गाणी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकरांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Sachin Pilgaonkar on Navra Maaza Navsaacha 2)
तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दुसऱ्या भागाच्या या बातमीने चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे. सगळेच प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सचिन पिळगांवकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये सचिन यांनी त्यांच्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे.
सचिन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी, अली असगर, हेमल इंगळे, सुप्रिया पिळगांवकर व चित्रपटाची इतर टीम पाहायला मिळत आहे. चित्रीकरणाचा शुभारंभ झाला असल्याचा त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. एकाने कमेंट करत, “अशोक सराफ सरांशिवाय कसकाय सुरु केलं शूटिंग” असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने, “अशोक सराफ असतील तरच आम्ही चित्रपट बघणार” असं म्हटलं आहे. अशोक सराफ चित्रीकरणावेळी न दिसल्याने चाहत्यांनी खंत व्यक्त केली आहे.
चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी पोस्ट शेअर करत स्टारकास्ट जाहीर केले आहेत. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.