‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून मुग्धा वैशंपायन ही गायिका घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती विविध ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करते आणि तिच्या गायनाचे सर्वत्र कौतुक होत असते. अशातच गायिकेने नुकतीच तिच्या सांगीतिक शिक्षणात उंच भरारी घेतली आहे. मुग्धाने भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून या अभ्यासक्रमात तिने मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे मुग्धावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यासंबंधित गायक व मुग्धाचा नवरा प्रथमेश लघाटेनेही नुकतीच मुग्धाचे अभिनंदन करणारी एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली होती. प्रथमेशने मुग्धाचा पदवी स्वीकारतानाचा फोटो शेअर करत “माझ्या प्रिय बायकोचं खूप खूप अभिनंदन! आम्हाला तुझा खूप अभिमान आहे” असं म्हटलं होतं. अशातच मुग्धानेही नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धाने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांना सांगण्यात मला अतिशय आनंद होत आहे की, मी भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून मला महाराष्ट्राचे माननीय कुलपती श्री. रमेश बैसजी यांच्या उपस्थितीत हे सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याचबरोबर या पदवी प्रदान सोहळ्यात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठ ग्रँड कमिशनचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार आणि इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते. त्याचबरोबर यानिमित्ताने मी माझ्या गुरु विदुषी शुभदा ताई पराडकर, डॉ. अनया थत्ते आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छिते.”
आणखी वाचा – घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला शोएब मालिक देणार इतके कोटी?, पहिल्या पत्नीला दिली होती इतकी रक्कम
यापुढे मुग्धाने तिच्या कुटुंबियांप्रती तिच्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत असे म्हटले की, “माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारे आणि मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देणारे माझे प्रिय आई-बाबा, ताई आणि प्रिय प्रथमेश तुमचेही आभार. आणि सर्वात शेवटी, माझे दुसरे घर म्हणजेच माझे सासरच्या मंडळींचेही आभार. माझ्या प्रिय कल्याणी वहिनी, यशिउ, विघ्नेश दादा तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला दिलेला पाठिंबा व सहकार्य मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”
दरम्यान, तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सद्वारे तिचे पुन्हा एकदा अभिनंदन केले आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.