मराठी व बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आजदेखील त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एका श्वानाला अमानुष मारहाण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने संताप व्यक्त केला आहे. “या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला त्वरित पकडा आणि तुरुंगात टाका” असं कॅप्शन त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच जमेल तितका व्हिडीओ शेअर करण्याचे आव्हान देखील केले आहे. (Ritesh deshmukh shared video)
रितेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जो व्हिडीओ शेअर केला आहे तो ठाण्यातील प्राण्यांचे ग्रुमिंग सेशन घेणाऱ्या एका नामांकित सेंटरमधील आहे. तेथील कर्मचारी श्वानाला मारहाण करत आहे. तसेच हा व्हिडीओ शूट केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा चेहरा हा भावनाशून्य दिसत आहे.
जिथे प्राण्यांची काळजी घेतली जाते तिथेच मुक्या प्राण्यांवर असे अत्याचार होत आहेत त्यामुळे अनेकांनी चिंतादेखील व्यक्त केली आहे. या घडल्या प्रकारावर अभिनेत्यासह नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. रितेशकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर ही पोस्ट मुंबई पोलिसांना टॅग केली आहे. यानंतर सर्वच स्तरातून लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्याला अटक केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ही घटना झाल्यानंतर ‘फ्री प्रेस जनरल’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी (PAWS)’ चे संस्थापक निलेश भागाने यांनी समस्त प्राणीप्रेमींच्या वतीने जिल्हा आयुक्तांना पत्र लिहून क्लिनिकचा कर्मचारी व क्लिनिकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुक्या प्राण्यांची सुरक्षा करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊन काम करतानादेखील दिसतात. रितेशसह वरुण धवन, प्रतीक बब्बर, अली गोनी या कलाकारांनीदेखील ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केलेल्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.
रितेश सोशल मीडिया अकाऊंटवर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘रेड २’,’विस्फोट’,’हाऊसफुल ५’,’मस्ती ४’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.