रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी अशी ओळख या दोघांना मिळाली आहे. दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश व जिनिलीयाने लग्नगाठ बांधली. जवळपास १० वर्षे डेट केल्यावर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी या जोडीने शाही विवाहसोहळा उरकला. मराठीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही या जोडीने आपल्या अभिनयाची छाप सोडली. (Riteish Genelia Wedding Anniversary)
सोशल मीडियावरही जोडी नेहमीच सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत, मजेशीर व्हिडीओ वा त्यांच्या दोन्ही मुलांचे अनेक रील ते शेअर करत असतात. अशातच आज त्यांच्या सुखी संसाराला १२ वर्षे पूर्ण होताच दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्या आहेत. यावेळी त्यांनी एक मजेशीर रील व्हिडीओ बनवत एकमेकांना हटके शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. देशमुख कुटुंबीयांचे सर्वच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
आणखी वाचा – असं आहे मुग्धा वैशंपायनच्या सासरकडचं घर, नवऱ्यासह कोकणात रमली गायिका, फोटो व्हायरल
जिनिलीयाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. जिनिलीया या व्हिडीओमध्ये चेष्टेत रितेशच्या पोटात बुक्का मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तीने लिहिले आहे की, “प्रिय नवरोबा! सदैव एकत्र राहणं, एकत्र काहीतरी खास करणं, कधीच हार न मानता प्रत्येक गोष्टीचा एकत्र सामना करणं यालाच प्रेम म्हणतात. लव्ह यू रितेश. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
जिनिलीया व रितेशच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच अनेक कलाकार मंडळींनीही हा मजेशीर व्हिडीओ पाहून कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अक्षय टांकसाळे, रेश्मा शिंदे या कलाकारांनी दोघांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.