मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर मुलगा गश्मीर महाजनीला ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. यामागचं कारण म्हणजे रवींद्र महाजनी पुण्यामधील एका सोसायटीमध्ये एकटेच राहत होते. निधनाच्या दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली. मग दोन दिवस रवींद्र महाजनी यांचे कुटुंबीय कुठे होते? असाही प्रश्न उपस्थित झाला. आता या सगळ्या प्रश्नांना गश्मीरने उत्तर दिलं आहे.
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये गश्मीरने त्याच्या वडिलांच्या सवयी आणि त्यांच्या इतर गोष्टींबाबत भाष्य केलं. जवळपास साडे तीन वर्ष रवींद्र महाजनी त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात नव्हते. गश्मीरला मुलगा झाला तेव्हा फक्त एकदाच ते नातवाला बघायला आले. त्यानंतर गश्मीर त्याच्या मुलाचे व्हिडीओ व फोटो वडिलांना पाठवत होता. पण मुलाचे सतत व्हिडीओ व फोटो पाठवणं त्यांना बहुदा आवडलं नाही. वडिलांनी गश्मीरला फोनमधून ब्लॉक केलं.
इतकंच नव्हे तर गश्मीरने त्याच्या आईबाबातही भाष्य केलं. रवींद्र महाजनी यांच्या पत्नीनेही त्यांना नातवाचे फोटो व व्हिडीओ पाठवले. पण त्यांनी स्वतःच्या पत्नीलाही ब्लॉक केलं. त्यांना त्यांचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायचं होतं. आयुष्य जगण्याची त्यांनी वेगळी पद्धत होती असं गश्मीरने म्हटलं आहे.
तो म्हणाला, “माझे ते वडील होते. मी कोणाला दोष देत नाही. वडील असल्यामुळे मला त्यांच्याबाबत अधिक वाटतं. त्यांना त्यांचं आयुष्य कशाप्रकारे जगायचं आहे याचा आम्ही आदर केला. त्यांना जर नातंच तोडायचं होतं तर तुम्ही काय करणार? ते आर्थिकरित्याही चांगले होते. त्यांना कोंडून ठेवणं हा पर्यायच नव्हता. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगायचा संपूर्ण अधिकार आहे. तो तुम्हाला त्यांना द्यावा लागेल. ते स्वतःची काळजी घेण्यासाठी खंबीर होते. त्यांच्याकडे लायसन्स पिस्तुल होतं. ती पिस्तुल आम्हाला पोलिसांनी दिली. बाबांचं मृत्यू दाखला आल्यानंतर मी पोलिसांकडे ते जप्त करणार आहे”. गश्मीरने यावेळी त्याची तसेच त्याच्या वडिलांची संपूर्ण बाजू मांडली.