सध्या सिनेसृष्टीत डीपफेक व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रश्मिका मंदानाचा फेक व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच कतरीना कैफ हिच्या फेक फोटोने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. मात्र ती खूपच घाबरलेली दिसली आहे. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. (Rashmika Mandanna Viral Video)
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रश्मिकाचा एक अश्लील बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आणि हा व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओने सर्वत्र खळबळ उडवून दिली. यासह, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडीओ काढून टाकण्यात यावा तसेच व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर तक्रार करण्यात यावी असं बोललं जातं आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका पापाराझींना टाळताना दिसली. तसेच यावेळी ती घाबरलेली ही दिसली.
या व्हिडिओने संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजवली आहे आणि अमिताभ बच्चनसारख्या अनेक बड्या सिनेतारकांनी या गुन्ह्यावर कारवाईची मागणी करत रश्मिकाला पाठिंबा दर्शविला आहे. आता त्या व्हिडिओनंतर रश्मिका पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर दिसली. टी-सीरिजच्या ऑफिसमधून बाहेर पडताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी रश्मिका खूपच घाबरलेली दिसत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत रश्मिकाला पाठिंबा दर्शविला आहे. रश्मिका सध्या तिच्या रणबीर कपूरबरोबरच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
रश्मिका मंदानाने तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत इंस्टाग्राम पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”