Animal Hindi Movie Cast, Review, Rating : रोमान्स किंग, चॉकलेट बॉयची चौकट मोडीत काढत याआधीही रणबीर कपूरने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं. ही चौकट मोडत असताना तो अपयशीही ठरला. पण थांबेल तो रणबीर कसला… नवं काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने ‘अॅनिमल’ सारखा चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेललं. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन कथा काय असेल याची थोडीफार कल्पना तर आलीच. मात्र प्रेक्षक त्याला नव्या रुपात कसं स्वीकारतील हा प्रश्नच होता. अखेरीस ‘अॅनिमल’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘रणबीर काय करु शकतो’ हे त्याने सगळ्यांनाच दाखवून दिलं आहे. प्रेक्षकांना मसालापट देण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांमध्ये भरकटलेल्या इतर बॉलिवूड चित्रपटांसाठी ‘अॅनिमल’ म्हणजे एक चपराक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
‘कबीर सिंग’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी आतापर्यंत कधीही न पाहिलेला चित्रपट तयार करणार असं विधान दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दिलं होतं. ‘अॅनिमल’ पाहिल्यानंतर त्यांचं हे विधान अगदी खरं ठरलं असं म्हणता येईल. हा चित्रपट तब्बल ३ तास २३ मिनिटांचा आहे. तीन तासांपेक्षा अधिक वेळ प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खिळवून ठेवणं हा नवा टास्कच. पण संदीप रेड्डी यामध्ये अगदी यशस्वी ठरले. चित्रपटाची कथा वडील-मुलाच्या नात्याभोवती फिरते. पण हे नातं दाखवत असताना तोच तोच रट्याळपणा न दाखवणं दिग्दर्शकाने कटाक्षाने टाळलं, यासाठी विशेष कौतुक.
चित्रपटाच्या कथानकाला भावनिक, रंजक वळण देताना चारही बाजू लक्षात घेणं संदीप यांना उत्तम जमलं आहे. रणविजय सिंगचे (रणबीर कपूर) वडील बलवीर सिंग (अनिल कपूर) हे देशातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांना व्यग्र वेळपत्रकामधून मुलाला वेळ देणं शक्य होत नाही. रणविजयचं बालपण वडिलांचा सहवास आपल्याला मिळणार का? यामध्ये जातं. वडील सतत व्यग्र, त्यांचा न मिळणारा सहवास या साऱ्या गोष्टी रणविजयच्या मनावर खोलवर पेरल्या जातात. मात्र जेव्हा बलवीर सिंग यांच्यावर गोळीबार होतो तेव्हा कथेमध्ये मोठा ट्वीस्ट येतो. वडिलांवर झालेला हल्ला रणविजयला सहन होत नाही. वडिलांच्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी रणविजय आकाश-पाताळ एक करतो. बलवीर सिंग यांच्याशी संबंधित काही व्यक्तींना भेटतो. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. रणविजय आपल्या वडिलांवर झालेला हल्ला, निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यास यशस्वी ठरतो का? हे सांगत चित्रपटाचं कथानक पुढे सरकतं.
चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हिंसा, भीतीदायक-थरारक दृश्य दाखवण्यात आली आहेत. अशाप्रकारचे सीन्स उभे करणं हा संदीप यांचा हातखंडच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. हॉलिवूड चित्रपटांचेच अॅक्शन सीन्स पाहत असल्याचा भास ‘अॅनिमल’ पाहताना होतो. हॉलिवूड चित्रपटांचं अनुकरण नसलं तरी तंत्रज्ञान, व्हिएफएक्सच्याबाबतीत वेगळं काहीतरी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. कथेच्या गरजेनुसार संवाद, सीन्सचा उत्तम मेळ दिग्दर्शकाने जमवून आणला आहे. चित्रपट सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो. चित्रपटाच्या मध्यंतरापूर्वीची किंवा मध्यंतराच्या नंतरची कथा रट्याळ वाटत नाही हे विशेष.
‘अॅनिमल’च्या क्लायमॅक्समध्येच खरी मजा आहे. ते सध्यातरी सरप्राइज ठेवलेलं उत्तम. चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही नक्की असं का म्हणत आहोत? हे तुम्हाला लक्षात येईल. रणबीरचा अॅक्शन अवतार तर क्या बात… पडद्यावर त्याची एन्ट्री होताच प्रेक्षकांच्या भुवया उंचावतात. हिंसक भूमिका उत्तम पद्धतीने कशाप्रकारे साकारता आली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे रणबीर आहे. फक्त रोमान्सच नाही तर अॅक्शनमध्येही मागे नाही हे रणबीरने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे. चित्रपटात भाव खाऊन गेला होता म्हणजे बॉबी देओल. बॉबीच्या वाट्याला चित्रपटात फार कमी सीन्स आले आहेत. मात्र तो प्रेक्षकांच्या मनात त्याची वेगळीच छाप पाडतो. छोटी भूमिका असली तरी प्रेक्षकांच्या कायम लक्षात कसं राहता येईल ते त्याने योग्यरित्या हेरलं आहे. रश्मिका मंदानाने रणबीरच्या पत्नीची साकारलेली भूमिका काही सीन्समध्ये रट्याळ वाटते. मात्र तिचे संवाद आणि अभिनयाचं विशेष कौतुक. अनिल कपूर यांनीही त्यांच्या स्टाइलने साकारलेली रणबीरच्या वडिलांची भूमिका वाखण्याजोगे आहे. ‘अॅनिमल’मधील तृप्ती डिमरीनेही साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहे.
‘अॅनिमल’ची जमेची बाजू म्हणजे मराठी कलाकारांची दिसणारी फळी. चित्रपटात मराठी कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. त्यामध्ये उपेंद्र लिमये व मृण्मयी गोडबोलेचं नाव घ्यावच लागेल. उपेंद्र यांनी त्यांच्या स्टाइलने चित्रपटात म्हटलेला ‘चांगभलं’ संवाद ऐकताच थिएटरमध्येही प्रेक्षक खळखळून हसतात. वेळोवेळी त्याने संवादामधून वापरलेली मराठी भाषा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. मराठी कलाकारांनी ‘अॅनिमल’ला एक सुंदर टच दिला आहे असं म्हणता येईल.
‘अॅनिमल’मधील गाणी विशेष आकर्षित करतात. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अॅक्शन सीन्ससाठी भावनिक गाणं चित्रपटात वापरण्यात आलं आहे. बी प्राकच्या आवाजातील ‘सब कुछ भुला देंगे’ तसेच भूपिंदर बब्बलच्या आवाजातील ‘अर्जन व्हॅली’ हे गाणं विशेष गाजणारं आहे. संदीप यांचा लार्जर दॅन लाईफ असा हा चित्रपट मनोरंजनाच्या हेतूने अगदी कोणताही संकोच न करता तुम्ही नक्की बघू शकता.
