Animal Vs Sam Bahadur Advance Booking : ‘अॅनिमल’ व ‘सॅम बहादुर’ या दोन्ही बिग बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ व विकी कौशल अभिनीत ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकत्र धडकले आहेत. कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा चित्रपट वडील मुलाच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगत आहेत, तर मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेला पाहायला मिळत आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनचं चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरु झाले. आता चित्रपटांचे तिकीटही मिळणं कठीण होऊन बसलं आहे. दोन्ही चित्रपटांत नेमका कोणता चित्रपट वर्चस्व गाजवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
Sacnilk.com ने दिलेल्या अहवालानुसार, ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने जोर मारलेला पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात, चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३.९५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे, ‘सॅम बहादुर’ने आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवशी १.८१ कोटी रुपये कमावले आहेत. ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवसाच्या हिंदी भाषिक बुकिंगमधून चित्रपटाने सुमारे १७.१ कोटी कमावले आहेत. १०,००० हून अधिक शोसाठी ५.७५ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तर ‘सॅम बहादुर’ने सुमारे १.८१ कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे ५७,८८८ तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट ३,००० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जाणार आहे.
‘अॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय चित्रपटात रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असल्याची सर्वत्र चर्चा आहे. भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक ‘सॅम बहादुर’ हा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा हे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट ५५ कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला असल्याची चर्चा आहे.