लोकसभा निवडणूक २०२४ अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष येत्या निवडणुकीत जिंकण्यासाठी सक्षम मतदार उभे करत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे आणि यात रामायण माळीकतील राम म्हणजेच अभिनेते अरुण गोविल यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.
अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपनं अरुण गोविल यांना मेरठ मधील तिकिट दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरठमधून सलग तीन वेळा खासदार राहिलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकिट भाजपनं रद्द करुण ते अरुण गोविल यांना दिलं आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा होती.
अखेर आता अरुण गोविल यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अरुण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. अरुण गोविल यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या जनतेच्या सेवेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. जय श्री राम”
काही वर्षांपूर्वी अभिनेते अरुण गोविल यांनी अलाहाबादमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र त्यावेळी अरुण गोविल यांनी राजकारणात येण्यास नकार दिला होता. याचा खुलासा खुद्द अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत केला आहे. अशातच आता ते मेरठमधून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, अरुण गोविल यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी त्यांच्याअ या उमेदरवारीवर आनंददेखील व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रामायण फेम अरुण गोविल यांची करिश्मा चालणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.