गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. रकुल प्रित सिंह व जॅकी भगनानी यांच्या लग्नानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचे लग्न पार पडले आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसीने उदयपूरमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये २३ मार्च रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे.
टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो बरोबर तिचा विवाह पर पडला आहे. तापसी ही प्रियकर मॅथियासबरोबर मागील १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि अखेर त्यांनी लग्न केले आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची सुरुवात २० मार्चपासून झाली होती आणि २३ मार्च रोजी हा हा विवाहसोहळा पार पडला.
तापसी पन्नूच्या लग्नाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केलं नव्हतं. अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील फक्त तिच्या जवळच्या मित्रांना, अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांनी आमंत्रित केले होते. अनुराग कश्यप आणि तापसी यांच्या ओळखीबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमांसाठी दोघे एकत्र आले होते. दिग्गज दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
दरम्यान, तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.