अंबानी कुटुंबियांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाचा प्री-वेडिंग सोहळा अगदी दिमाखत संपन्न झाला. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलिवूडबरोबरचं साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये थलायवा डिक म्हणजेच रजनीकांत त्याची पत्नी लता व मुलगी ऐश्वर्याबरोबर या पार्टीत सहभागी झाले होते. दरम्यान या सोहळ्यात रजनीकांत यांच्या एका कृतीने ते सध्या चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. (Rajinikanth Trolled For His Behaviour)
रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने त्याच्या घरातील मदतनीससह चारचौघात दिलेली वागणूक पाहून त्याचे चाहते संतापले आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये सलग तीन दिवस सुरु होते. पाहुण्यांच्या यादीत सामील झालेल्या रजनीकांतनेही १ ते ३ मार्च या कालावधीत कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावली. पार्टीतील त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले, दरम्यान त्यांच्या एका व्हिडीओने मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा आटोपल्यानंतर रजनीकांत कुटुंबासह घरी निघाले असतानाचा हा व्हिडीओ आहे. विमानतळाच्या दिशेने ते जात असताना पापाराझीने त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी रजनीकांतने कुटुंबासह पोजही दिली, पण यादरम्यान त्याने मागे उभ्या असलेल्या आपल्या घरातील मदतनीसला हाताने बाजूला होण्याचा इशारा केला, जेणेकरुन ती कॅमेरा फ्रेममध्ये येऊ नये, असा त्यांचा उद्देश होता. अनेकांना अभिनेत्याची ही कृती आवडली नसून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
रजनीकांतच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने म्हटले आहे की, “मला महिलेच्या प्रतिष्ठेची चिंता आहे, तिला तिची जागा दाखवण्यात आली. तिच्याकडेही असेच पैसे असते तर तिला अपमानास्पद वाटले नसते”. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “त्यांनी त्यांचे सामान उचलणाऱ्या लोकांचे आभार मानले पाहिजेत”. तर आणखी एका नेटकऱ्याने, “ही व्यक्ती आणि त्याचे कुटुंब खूप घृणास्पद आहे”, असंही म्हटलं आहे.