अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या अपघाताशी संबंधित बातम्या सतत चर्चेत असतात. ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा श्री तेजा गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. अल्लू अर्जुन आणि तेज यांची अद्याप भेट झालेली नाही. अशातच आता अल्लू अर्जुनच्या वडिलांनी जखमी मुलाची भेट घेतली आहे. (Allu Arjun father meets Pushpa 2 stampede injured boy)
अल्लू अर्जुनचे वडील आणि निर्माता अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जाऊन मुलाची भेट घेतली. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, “मी आताच श्रीतेजाला आयसीयूमध्ये भेटलो आहे. त्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांशी मी बोललो आहे. गेल्या १० दिवसात मुलाची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, परंतु यास अधिक वेळ लागू शकतो. त्याच्या उपचारांसाठीची सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. मी कृतज्ञ आहे की सरकारनेदेखील ही परिस्थिती सामान्य होण्यास मदत करण्यासाठी पाऊल टाकलं आहे”.
Allu Arjun's father visits Pushpa 2 stampede child👦🏻🏥 pic.twitter.com/7yZWklJaSl
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 18, 2024
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याने चप्पल घालून घेतले सात फेरे, ट्रोल होताच म्हणाली, “मंदिरात जातो तेव्हा…”
यानंतर अल्लू अर्जुन अद्याप कुटुंबीयांना किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलाशी भेटला नाही या मुद्द्यावर अरविंद म्हणाले की, “अल्लु अर्जुनने अद्याप हॉस्पिटलला का भेट दिली नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी त्याला श्रीतेजाला भेटायचे होते. मात्र, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव भेटण्यास मनाई केली आणि त्याच दिवशी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला”.
यापुढे ते असंही म्हणाले की, “आमच्या कायदेशीर टीमने अल्लू अर्जुनला हॉस्पिटलमध्ये न जाण्याचा किंवा त्याच्या आई-वडिलांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. मी आज त्या मुलाला भेटण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे, कारण अल्लू अर्जुन त्याला भेटू शकत नाही याचे वाईट वाटत होते. या भेटीसाठी मला सहमती दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानतो”.