साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १५ हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र हा चित्रपट तरीही चर्चेत आहे आणि या चर्चाही संमिश्र आहेत. एकीकडे पुष्पा बॉक्स ऑफीसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे तर दुसरीकडे प्रीमियर झालेल्या महिलेच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या लहान मुलाप्रकरणाला अजूनही पूर्ण विराम लागलेला नाही. या प्रकरणी काहीजण अल्लू अर्जुनला पाठिंबा देत आहेत, या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचे म्हणत आहेत. अशातच आता त्याच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. (Allu Arjun House Attack)
हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अल्लू अर्जुनच्या घरावर रविवारी आंदोलकांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या घराबाहेर ठेवलेली भांडी फोडली, रागाच्या भरात संपूर्ण लॉन फाडले आणि टोमॅटो फेकण्यात आले. अन्य ठिकाणी अभिनेत्याचा पुतळाही जाळण्यात आला. आंदोलक पीडितेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांनी एकूण आठ आंदोलकांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.
BREAKING: Allu Arjun house protestors DEMAND ₹1⃣ cr for Pushpa 2⃣ stampede victim family. pic.twitter.com/pJTgQDDcM2
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 22, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनच्या घरावर उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉइंट ॲक्शन कमिटीच्या (जेएसी) सदस्यांनी हल्ला केला. ओयू जेएसीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या आंदोलकांनी रेवतीच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी घोषणाबाजी केली. अभिनेत्याच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनाही थांबवण्यात आले. हल्ल्यादरम्यान दगडफेकही करण्यात आल्याचे दावे करण्यात येत आहेत, मात्र याबद्दल खात्रीशीर माहिती समोर येणे बाकी आहे.
आणखी वाचा – अखेर अक्षय केळकरने दिली प्रेमाची कबुली, दहा वर्षे पूर्ण होताच ‘त्या’ खास व्यक्तीसह रोमँटिक व्हिडीओ केला शेअर
०४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरला अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गेला होता, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी जनसमुदाय उसळला होता. याचदरम्यान प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यामुळे झालेल्या एका अपघातात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा नऊ वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. जखमी मुलावर उपचार करून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती, मात्र काही वेळात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेत त्याने परवानगीशिवाय तेथे गेलो नसल्याचे सांगितलं. अशातच आता त्याच्या घरावर हल्ला झाला आहे.