Pushpa 2 Box Office Collection In Hindi : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुचर्चेत व प्रतीक्षेत असा चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलरच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे बोर्ड दिसले. आणि अशारितीने ‘पुष्पा 2’ ची भव्य सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. ‘पुष्पा 2’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केले याबाबत अपडेट समोर आली आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आग नसून वणवा ठरला. आगाऊ बुकींगमध्येच या चित्रपटाने धुमाकूळ घातला असला, तरी थिएटरमध्ये आल्यानंतर ‘पुष्पा २’ने खळबळ उडवून दिली. शाहरुख असो की प्रभास, ‘पुष्पा 2’ ने एकाही चित्रपटाचे रेकॉर्ड सोडले नाही आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतक्या नोटा छापल्या की तो देशातील सर्वात मोठा ओपनर ठरला. या चित्रपटाने हिंदी भाषेतधुमाकूळ घातला आणि इथेही शाहरुख खानच्या ‘जवान’ला पराभूत करुन सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रम केला.
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात. ‘पुष्पा 2’ प्रदर्शित झाल्याचा आनंद प्रेक्षकांनी साजरा केला. २०२१ च्या ब्लॉकबस्टर पुष्पाच्या या सिक्वेलने शाहरुख खानच्या ‘जवान’ च्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘जवान’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी हिंदीमध्ये ६५ कोटी रुपये कमावले होते, तर हिंदी भाषेत ‘पुष्पा 2’ चे ओपनिंग डे कलेक्शन ६७ कोटी रुपये आहे.
या स्थितीत ‘पुष्पा 2’ ने ‘जवान’चा २ कोटींनी पराभव केला आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी ‘पुष्पा 2’ कोणता बेंचमार्क सेट करतो हे पाहणे बाकी आहे. सध्या सर्वांच्या नजरा अल्लू अर्जुन आणि रश्मिका स्टारर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आहेत.