Priya Bapat And Umesh Kamat : नाटक, मालिका व चित्रपटांमधून अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही जोडी एकत्र दिसली. या दोघांनीही त्यांच्या अभिनय कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री जितकी चाहत्यांना आवडते, तितकीच ती ऑनस्क्रीन पाहायलाही आवडते. प्रिया व उमेश हे दोघे सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असतात. सध्या ही जोडी नाटकविश्वाकडे वळली आहे. रंगमंचावर प्रिया व उमेश दोघेही रुळले आहेत. केवळ अभिनयच नव्हे तर नाटकांच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं आहे. उमेश हा नाटक, मालिकेतील ओळखीचा चेहरा आहे, मात्र अभिनेता चित्रपटांमध्ये तितकासा दिसला नाही. यावरुन आता त्याची पत्नी प्रिया हिने खंत व्यक्त केली आहे.
याबाबत अभिनेत्रीला अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’च्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी प्रिया मनमोकळेपणाने बोलली. प्रिया म्हणाली की, “उमेशच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याची निवड ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी राहिली आहे. मी खरंच मनापासून सांगते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून मी त्याचं काम बघत आहे. त्याला टेलिव्हिजन आणि नाटकांमध्ये ज्या विश्वासार्हतेने पात्र दिली गेली आहेत तितक्या विश्वासाने त्याला सिनेमातली पात्र दिली गेली नाहीत. यामागचं कारण मला कधीच समजलेलं नाही. मला नाही माहिती की, मी हे बोललं पाहिजे की नाही पण, तो मराठी इंडस्ट्रीतला अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने नाटकामध्ये स्वत:साठी प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे”.
पुढे प्रिया म्हणाली, “उमेशच्या काम करण्याच्या क्षमतेवर मलाच नाही तर इंडस्ट्रीत सुद्धा कोणालाच शंका नसावी. इतकं तो छान काम करतो. त्याच्यात प्रचंड क्षमता आहे पण, सिनेमासाठी तो नेहमी अंडररेटेड राहिला. मला माहिती नाही का?. त्या प्रकारचे सिनेमे त्याला कधी ऑफरच नाही झाले, तशा भूमिका त्याच्याकडे आल्याच नाहीत. मी आणि उमेश याबद्दल नेहमीच चर्चा करतो. की यामागचं कारण काय?, याबद्दल आम्ही बरेचदा बोललो आहोत”.
आणखी वाचा – जिममध्ये रश्मिका मंदानाला दुखापात, सलमान खानसह ‘सिकंदर’चं शूट करताना घडली घटना, आता नेमकी परिस्थिती कशी?
याबाबतची खंत व्यक्त करत ती पुढे म्हणाली, “जे माझ्याबाबतीत होत आहे ते उमेशच्या बाबतीत व्हावं असं मला वाटत नाही. जे निर्माते आहेत त्यांना उमेशला घेऊन सिनेमा का करावासा वाटत नाही?. मला असं वाटतं की, यावर आपण विचार केला पाहिजे. नेहमी प्रेक्षक येत नाहीत असं आपण बोलून चालणार नाही. हे एक कारण नाही आहे हेदेखील सगळ्यांना माहित आहे”.