Rashmika Mandanna Injured In Gym : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना १० जानेवारीला सलमान खानबरोबर तिच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल सुरु करण्याच्या तयारीत होती. शूटिंग पुन्हा सुरु होण्याआधीच तिला जिममध्ये दुखापत झाली होती. अभिनेत्रीला जिममध्ये दुखापत झाली असल्याने तिच्या चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रानुसार, तिचे व्यस्त वेळापत्रक पुन्हा सुरु करण्यापूर्वी तिला पूर्णपणे बरे होणे आवश्यक आहे. यासाठी त्याला छोटा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री बरी होत आहे आणि लवकरच सेटवर परत येणार असल्याचं समोर आलं आहे.
रश्मिका मंदान्नाच्या जवळच्या सूत्राने ‘पिंकविला’ला तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. ते म्हणाले, “रश्मिका नुकतीच जिममध्ये जखमी झाली आहे आणि ती विश्रांती घेत आहे आणि बरी होत आहे. मात्र, यामुळे तिच्या चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. तरीसुद्धा, तिला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे आणि लवकरच ती सेटवर पुन्हा काम सुरु करेल”. यापूर्वी, मिड-डेच्या वृत्तानुसार, सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना १० जानेवारीला मुंबईत ‘सिकंदर’च्या शूटिंगचे शेवटचे शेड्यूल सुरु करणार होते. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते सेटवर परततील. प्रदर्शनाची तारीख ही मार्चची असूनही टीमला शूटिंग वेळेत पूर्ण करायचे आहे.
सूत्राने पोर्टलला सांगितले की, दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास परिश्रमपूर्वक काम करत आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. पोस्ट प्रॉडक्शनबरोबरच ते नवीन सीनही शूट करत आहेत. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’मध्ये सत्यराज, काजल अग्रवाल आणि प्रतीक बब्बर यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.
ब्लॉकबस्टर ‘किक’ या चित्रपटानंतर जवळपास एक दशकानंतर सलमान खानचा हा चित्रपट साजिद नाडियादवालासह येतोय. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित, हा ॲक्शन एंटरटेनर या वर्षी मार्चमध्ये २०२५च्या ईदला रिलीज होणार आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘पुष्पा’ फ्रँचायझीच्या ब्लॉकबस्टर कलेक्शनसह एकूण ३०९६ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन देणारी रश्मिका तिच्या चाहत्यांना तिच्या मेहनतीने आणि सकारात्मकतेने सतत प्रेरित करत आहे. हिट चित्रपटांच्या या मालिकेने तिचा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश केला आहे.