टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आवडते जोडपे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविकाच्या एक लहान मुल येणार आहे. प्रिन्स व त्याची अभिनेत्री पत्नी युविका चौधरी लवकरच आई-बाबा होणार आहेत. युविका गरोदर असून हे जोडपं लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रिन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रिन्स व युविका यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
प्रिन्सने त्याच्या सोशल मीडियावर बाळाबद्दलची खास पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “सर्वांना नमस्कार, सध्या मला माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे कळत नाहीये. आम्ही एकाच वेळी खूप आनंदी व त्याचबरोबर चिंताग्रस्त आहोत. आम्ही देवाचे आभारी आहोत आणि लवकरच आम्ही आई-बाबा होणार आहोत, त्यासाठी खूप उत्साहीदेखील आहोत. कारण, प्रविका (प्रिन्स-युविका यांचे बाळ) लवकरच येणार आहे. युविका आता तू माझ्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असशील, कारण आपल्या आयुष्यात येणारं बाळ आपल्या सर्वांची प्राथमिकता असेल”.
आणखी वाचा – अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?
यापुढे त्याने “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण काही दिवसांनी तू नाही तर ते बाळ माझी प्राथमिकता असेल. मी खूप आनंदी आहे की, ज्याच्यासाठी मी एवढी मेहनत केली आहे, ते सगळं मी बाबा झाल्यावर त्याच्यासाठी असेल. सर्व आई-बाबांची असतात, त्याप्रमाणे माझीही स्वप्नं होती. जसं आमच्या पालकांनी आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला चांगली माणसं बनवलं, तसाच प्रयत्न आम्हीही आमच्या बाळासाठी करु” असं म्हणत त्याने त्याच्या बाळाबद्दल या पोस्टद्वारे उत्सुकता दाखवली आहे. प्रिन्सने शेअर केलेल्या या पोस्टवर त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांनीही त्यांना आई-बाबा होण्याबद्दल कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.