सध्या सोशल मीडियावर ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेचे प्रोमो धुमाकूळ घालत आहेत. तेजश्री प्रधान व राज हंचनाळे या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार असल्याचं समोर आलं आहे. तर या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार आहे. या नव्या मालिकेत मुक्ता व सागर यांची अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. तर या त्यांच्या अनोख्या लव्हस्टोरीमध्ये मिठाचा खडा टाकायला अपूर्वा म्हणजेच सावनी हे पात्र येणार आहे. (Apurva Nemlekar Troll)
मालिकेत अपूर्वाची एन्ट्री असलेला एक नवा प्रोमो नुकताच तिने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या प्रोमोखाली कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी तिला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अपूर्वा या मालिकेत सावनी ही भूमिका साकारत असून ती सागरची पूर्वाश्रमीची पत्नी आहे.आणि त्यांची मुलगी सई हिच्या कस्टडीसाठी सावनी प्रयत्न करताना प्रोमोमध्ये दिसतेय. स्टार प्रवाहकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सागर सईच्या शाळेतील एक प्रोजेक्ट कुठेतरी विसरुन येतो. तेव्हा सई सागरवर चिडते की आपण प्रोजेक्ट कुठेतरी विसरलो.
त्याचवेळी सावनी टाळ्या वाजवत सागर समोर येते आणि बोलते की, ‘सईची आई आहे मी. पण एक बाप म्हणून तू तिची जबाबदारी घेऊ शकत नाही, हे तू वारंवार सिद्ध केलं आहेस, सईची कस्टडी मी मिळवणारच’. तेवढ्यात तिथे मुक्ता सईचा प्रोजेक्ट घेऊन शाळेत पोहोचते आणि बाबावर रुसलेल्या सईची समजूत काढते. आता मुक्ता व सागर यांच्या लव्ह स्टोरीमध्ये सावनी कोणते विघ्न आणणार, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.
अपूर्वाने शेअर केलेल्या मालिकेच्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेतच, शिवाय अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे. अनेकांनी ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा रीमेक असल्याने ट्रोलही केले आहे. या मराठी मालिकेत जे पात्र अपूर्वा साकारत आहे, तेच पात्र हिंदी मालिकेत ‘शगुन’ या नावाने अभिनेत्री अनिता हसनंदानी साकारत होती. टीव्हीवर लोकप्रिय व्हॅम्प म्हणून अनिताला त्यावेळी विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

त्यामुळे शगुनच्या भूमिकेला अपूर्वा न्याय देईल का अशी शंका काही युजर्सनी व्यक्त केली आहे. एकाने नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘तुमचा कास्टिंग डिरेक्टरचे डोळे एकदा तपासून घ्या, शगुनचे पात्र अपूर्वा… काय विनोद आहे’. आणखी एकाने लिहिले आहे की, ‘शगुनच्या भूमिकेसाठी खूपच वाईट निवड’. तसेच बऱ्याच नेटकऱ्यांनी ‘नकळत सारे घडले’ या मालिकेचा रिमेक असल्याचं कमेंट करत म्हटलं.