मराठी कलाक्षेत्रात आमचं ठरलं म्हणत अनेक मराठमोळ्या कलाकारांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. या पाठोपाठ आणखी एका मराठमोळ्या व प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराने रिलेशनशिपमध्ये असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. हा अभिनेता म्हणजे दगडू या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रथमेश परब होय. प्रथमेशने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory)
लवकरच प्रथमेश व क्षितिजा विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या केळवणाचेही अनेक फोटोस सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले. यानंतर आता इट्स मज्जा या युट्युब चॅनेलने प्रथमेश व क्षितिजा यांच्या केळवणाचा घाट घातला होता. यावेळी दोघांसह अनेक गप्पा रंगल्या. प्रथमेशच्या आयुष्यात क्षितिजा कशी आली, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली याशिवाय क्षितिजा नेमकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे अशा विविध गप्पा रंगल्या.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेशने त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली याबाबत खुलासा केला आहे. प्रथमेश म्हणाला, “‘गुंतता हृदय हे’ नावाची एक सीरिज तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. आणि त्यात खूप सुंदर असं लिखाण तिने केलं होतं. त्याचबरोबर तिचे खूप छान फोटोही त्या पोस्टमध्ये होते. ते पाहून मी तिला इन्स्टाग्रामवर hi, मला तुझी सिरीज आवडली वगैरे असा मॅसेज केला. पण तिने तो मॅसेज पाहिलाच नाही. तीन-चारवेळा मॅसेज करुनही तिने दुर्लक्ष केलं. त्यांनतर मी फेसबुकवरुन मॅसेज केला. तेव्हा तिने मला इन्स्टाग्रामवर थँक्स असा मॅसेज केला. त्यानंतर आमचं बोलणं सुरु झालं” असं तो म्हणाला.
पुढे प्रथमेश म्हणाला, “मी टाईमपास चित्रपटाचं ठाण्यात शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो. ती नेरळवरुन मला भेटायला आली होती. तेव्हा आम्ही बऱ्यापैकी बोलत होतो, भेटल्यावर ती मला म्हणाली आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का? यावर मी तिला मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला चालेल, असं बोललो. तेव्हा तिने मला, तू मला आय लव्ह यु नाही बोलणार का अस विचारलं, मी तेव्हा गमतीत तिला, आय लव्ह यु टू असं बोललो. त्यानंतर बरेचदा मी आय लव्ह यु बोललो आहे”, असंही प्रथमेश म्हणाला.