अक्षय कुमारची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने लग्नानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून काही वर्ष लेखिका म्हणून काम केलं. तिने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी सोडलेले शिक्षणही पूर्ण केले. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिचा मुलगा आरवसह विद्यापीठात प्रवेश अर्ज भरला होता. अभिनेत्रीने तिचे केवळ शिक्षण पूर्ण न करता पदवी देखील मिळवली आहे, याची माहिती अभिनेता अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत दिली. (Akshay Kumar On Wife)
अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बायकोच्या पदवीप्राप्त झाल्यानंतरचा एक फोटो शेअर करत तिचं अभिनंदन केलं. अभिनेत्रीने कोरोनानंतर पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. आता ट्विंकलचा या क्षेत्रातील अभ्यास पूर्ण झाला असून तिला पदवीही मिळाली आहे. फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की, तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला”.
अक्षयने पुढे लिहिलं आहे की, “तू जेव्हा मला सांगितलं त्या दिवसांनंतर मी तुला मेहनत करताना पाहिलं. घर, करिअर, मला स्वत:ला व माझ्या मुलांना तसेच तुझं विद्यार्थी जीवन सांभाळत तू घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. मला माहित आहे की, मी एका सुपर वुमनशी लग्न केले आहे. आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी, मी अजून थोडा अभ्यास केला असता तर टीना, मला तुझा किती अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी माझ्याकडे अजून शब्द असते. अभिनंदन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत त्याने बायकोच कौतुक केलं आहे.
अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहत्यांसह, कलाकार मंडळींनी कमेंट करत ट्विंकलच अभिनंदन केलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, “एक पुरुष आपल्या आवडत्या महिलेसाठी इतकं भरभरून लिहितो हे कौतुकास्पद आहे”. तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “असा नवरा प्रत्येकाला मिळायला हवा” अशा अनेक कमेंट करत अक्षयच्या बायकोला असणाऱ्या पाठिंब्याचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.