लग्न ठरण्यापूर्वीचे अनेक किस्से, कुणाचे मैत्रीतून खुललेले प्रेम तर काहींचे अरेंज मॅरेज. लग्नाच्या वेळच्या त्या गोड आठवणी अन् पहिल्या दिवाळीचा उत्साह हा काही वेगळाच असतो. लग्नानंतर येणारी पहिली दिवाळी प्रत्येक जोडप्यासाठी खास असते. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे या दिवाळीचे विशेष कौतुक असते. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आपली यंदाची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणार आहेत. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता प्रथमेश परब व त्याची बायको क्षितिजा परब. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा लग्नबंधनात अडकले. दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. दोघे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. (Prathamesh and Kshitija Diwali Celebration)
अशातच प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांच्या पहिल्या दिवाळसणानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांचा यंदाचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे आणि यानिमित्त या दोघांचे सोशल मीडियावर कौरतूक होत आहे. प्रथमेश व क्षितिजा यांनी खारदांडा येथील Sec Day school मधील स्पेशल मुलांबरोबर यंदाची दिवाळी साजरी केली आहे आणि याचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. याबद्दल प्रथमेश व क्षितिजा यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्यासाठी यंदाची दिवाळी किती खास आहे याविषयीच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम स्पेशल असते. त्यातुन लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून स्पेशल व्हायला हवी.. म्हणूनच आम्ही हा दिवस स्पेशल करण्याचा प्रयत्न केला Sec Day school, खारदांडा येथील मुलांबरोबर… त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू, चेहऱ्यावरची प्रचंड सकारात्मकता, आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार त्यांच्या वागण्यातून दिसतो”.
यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं की, “आपल्याकडे सगळं असून आपण लहानसहान गोष्टींची किती सहज तक्रार करतो ना! पण या मुलांकडे बघून जाणवतं, की तक्रार करण्यापेक्षाही, आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजे. जेव्हा आम्ही या मुलांना भेटलो, तेव्हा काही जण म्हणाले , अरे peter भैया, काही म्हणाले, दगडू दादा, पण त्या व्यतिरिक्त कित्येक मुलांनी सिनेमा कधी बघितलाच नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही होतो, आपल्याबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले एक ताई दादा आणि खरंतर तेच पुरेसं होत. या मुलांसाठी, शाळेने, एक स्पेशल दिवाळी बाजार आयोजित केला होता.
यापुढे प्रथमेश व क्षितिजा यांनी म्हटलं की, “त्या मुलांनी ,पणत्यांवर सुरेख रंगवल्या, छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवले, रांगोळीचे रंग पॅक केलं, त्यांची विक्री केली. बरं जितकं कौतुक या मुलांचं आहे, तितकंच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे. दिवाळीच्या झगमगाटात, दिव्यांच्या लखलखटात, फटाक्यांच्या आतषबाजीत सुद्धा आज फार शांतता आणि प्रसन्नता जाणवत आहे”.