दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा! दिवाळी निमित्त सध्या राज्यभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी म्हटलं की फटाके तर आलेच. लहान मुलांपासून पार वृद्धांपर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील मंडळी फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. फटाक्यांच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करतात. पण फटाके फोडताना विशेष काळजी घ्यायला हवी अन्यथा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. असंच काहीसं झालं होतं मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदेबरोबर. अभिनेत्री शर्मिला शिंदे सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत काम करत आहे. दिवाळीनिमित्त तिने तिचा लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. (Sharmila Shinde Firecrackers Story)
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शर्मिलाच्या या किस्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून तिने लहानपणी हातात फटाका फुटल्याचा एक किस्सा सांगितला आहे. याबद्दल तिने असं म्हटलं की, “दिवाळी हा सर्वांप्रमाणे माझाही आवडता सण आहे. जेव्हा मी लहानपणी फटाके उडवायचे तेव्हाचा एक किस्सा आहे, तेव्हा एक नवीन फॅड आलं होतं की हातात फटाका घ्यायचा आणि तो फुटत आला की उडवायचा. आता ते सगळे जण करतात, पण तेव्हा ते खुप नवीन नवीन होतं”.
यापुढे तिने असं म्हटलं की, “तेव्हा मी तो चौकोनी फटाका ज्याला अटॉम बॉम्ब म्हणतात तो हातात घेतला होता. पेटवला आणि मी थांबले होते. जवळपास पेटत आला होता आणि मी नेमकी तो फटाका फेकणार तेवढ्यात मला माझ्या आईच्या मैत्रीणीच्या मुलीने गुड्डी असा आवाज दिला आणि मी त्याच्याकडे बघून ओ… असं म्हटलं. म्हणजेच त्याला मी उत्तर दिलं. मी ओ… केल्यानंतर हातातला फटाका फुटला. आपण सिनेमात वगैरे बघतो की फटाका फुटल्यानंतर तोंड काळं होतं. कपडे, हात वगैरे काळे होतात. अगदी तसंच माझंही झालं होतं.”
यापुढे तिने सांगितले की, “तो हातातला फटाका इतक्या जोरात फुटला की, माझ्या कानठळ्या बसल्या. दहा मिनिटे माझ्या कानातून आवाज येत होता आणि मी दहा मिनिटे तशीच उभी राहून थरथरत होते. मग मला माझ्या त्या आदित्य नावाच्या मित्राने धरून पाण्याच्या टाकीकडे नेलं आणि तोंडावर पाणी मारलं. मला गदगदा हलवलं तेव्हा मी थोडी नॉर्मल झाले. माझा हात हत्तीसारखा सुजला होता. हा किस्सा मला नेहमी आठवतो, की एखाद्याने आवाज दिला म्हणून मी अगदी मूर्खासारखं बघितलं”. यापुढे शर्मिलाने सर्वांना आवाहन करत असे म्हटले की, “माझा हा मजेशीर किंवा विनोदी असला तरी कृपया फटाके फोडू नका. ही माझी विनंती आहे. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”