Ankita Walavalkar and Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या घरात सगळ्याच स्पर्धकांची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात स्पर्धक मंडळींनी तुफान राडे केले. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. तर गायक अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हवा असलेली पाहायला मिळाली. अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस’च्या या घरात स्पर्धकांची अनेक नाती जुळलेली पाहायला मिळाली. काहींमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसले तर काहीजण भाऊ-बहिणीच्या नात्यात अडकले.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता हे स्पर्धक त्यांची ही नाती जपताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील अंकिता वालावलकर व धनंजय पोवार ही भावा बहिणीची जोडी विशेष चर्चेत राहिली. आता ‘बिग बॉस’नंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलेली दिसत आहे. ‘बिग बॉस’नंतर धनंजय व अंकिता पहिल्यांदाच भेटले असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता तिच्या घरी कोकणात गेली होती. कोकणात अनेकांच्या भेटीगाठीचे फोटो, व्हिडीओ तिने शेअर केले होते.
यानंतर आता अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह म्हणजेच कुणाल भगतसह कोल्हापूर गाठलं. अंकिताने कोल्हापूरला भेट देत डीपीच घर गाठलं आहे. अंकिता तिच्या नवऱ्यासह डीपी व त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेली आहे. या भेटीचे व्हिडीओ तिने सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. अंकिताने डीपीच्या सोसायटी फर्निचर या दुकानालाही भेट दिली. तिथे ती डीपीच्या आई व बाबांनाही भेटली. त्यांचेही पाया पडून अंकिताने आशीर्वाद घेतले.
त्यानंतर अंकिता व तिच्या नवऱ्याने डीपीसह कोल्हापूर स्पेशल तांबड्या-पांढऱ्या रस्श्यावर ताव मारला. अंकिता व डीपीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी अंकिता व डीपीने व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता त्यांनतर अखेर ही बहीण-भावाची जोडी एकत्र आली आहे.