छोटा पडदा, चित्रपट किंवा नाटक, या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी स्वतःला रंगभूमीला वाहून घेतले असून आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहे. दामलेंनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरही अनेक चित्रपटांतून काम केले आहे. या तिघांना एकत्र पदडद्यावर पाहणे ही एक पर्वणीच होती.
अनेक काळ हे तिघे प्रेक्षकांना पडदयावर दिसले नसले तरी, प्रशांत दामले लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांनी दिलेली शिकवण आजही तंतोतंत पाळत आहेत. स्वत: दामलेंनी त्यांच्या आठवणीत हा किस्सा ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात व्यक्त केला आहे. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या निमित्ताने ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात प्रशांत दामलेंनी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांचा सल्ला करिअरमध्ये फायदेशीर ठरला असल्याचे म्हटलं आहे.
यावेळी प्रशांत दामले यांनी असं म्हटलं की, “लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांनी मला सांगितले होते की, स्वच्छ विनोद करावेत. Below the belt म्हणजेच कमरेखालचे विनोद करू नयेत. मुलगी बाजूला बसली असल्याची आई-वडिलांना लाज वाटेल आणि आई-वडील बाजूला असल्याची मुलीलाही लाज वाटेल असे विनोद करू नयेत. स्वच्छ विनोद असावेत”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या खूप आठवणी आहेत. या नाटकातून प्रेक्षकांना खूप हसायला मिळेल. हसल्याने तब्येतही चांगली राहते. त्यामुळे या नाटकातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होईल. स्वच्छ विनोदी असे हे नाटक आहे”.
आणखी वाचा – “राम फक्त अयोध्येत…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, “इतके वर्षे…”
दरम्यान, रसिकांना हास्याची मेजवानी देणाऱ्या ‘माधव’ने मध्यंतरी रंगभूमीवरून ब्रेक घेतला होता. अशातच आता रंगभूमीवर प्रशांत दामलेंचे ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहे. या नाटकाचा शेवटचा प्रयोग २००५ मध्ये झाला होता. त्यानंतर आता तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.