मराठी नाटक व मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले. ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ अशा अनेक मालिकांमधून अभिनय करत त्याने प्रेक्षकांच्या मनात आले घर केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता नुकताच त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. आशुतोषने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर त्याची परखड मतं मांडली. अशातच त्याने २२ जानेवारी रोजी अयोध्येत पार पडलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणाबद्दलही भाष्य केले आहे. याबद्दल आशुतोषने त्याचा आईबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे.
हा किस्सा सांगताना त्याने असा म्हटलं की, “२२ जानेवारी रोजी आयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होता. टीव्हीवर ते सगळं चालू होतं आणि मी त्यादिवशी कोणटा तरी चित्रपट बघण्यासाठी बाहेर जात होतो. तर आईने मला अडवलं आणि “कुठे जात आहेस?” असं विचारलं. यावर मी आईला चित्रपट बघायला जात असल्याचं सांगितलं. यावर आई मला “हे टीव्हीवर काय चालू आहे ते बघना” असं म्हणाली. यावर मी आईला “हो माहीत आहे, कळलं. त्यात आता काय बघायचं. चांगली गोष्ट आहे. छान, मस्त होऊदे” असं म्हटलं.
यापुढे तो असं म्हणाला की, “यावर आई “ते राम तुला जेव्हा शिक्षा देतील तेव्हा तुला कळेल” असं म्हणाली आणि मला हसू आलं. अर्थात आई हे मस्करीत म्हणाली. पण मस्करीतसुद्धा हे वाक्य येत आहे. यावर मी आईला असं म्हटलं की, ‘राम आएंगे, राम आएंगे’ म्हणून जे काही चालू आहे. त्यात आपल्या घरातला राम नाही गेला का? इतके वर्ष आपल्यात कोणत्या राजकीय किंवा धार्मिक गोष्टीवरुन वाद किंवा मतभेद झाले नाहीत. आज होत आहेत. तर मग राम खरंच आलेत की राम घराघरातून गेले आहेत. हा विचार आपण करायला पाहिजे आणि हे फक्त घरापुरतं मर्यादीत नसून समाजातही तेच आहे. राम आलेले नाहीत. ते गेले. ते फक्त अयोध्येत आहेत.”
दरम्यान, आशुतोषला त्याच्या अभिनयाचं बाळकडू त्याच्या घरातूनच मिळालं. त्याचे वडील वडिल विजय गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असून त्याचे आजोबा विद्याधर गोखले हेदेखील एक ज्येष्ठ नाटककार होते. तरीही आशुतोषने स्वत:च्या अभिनयाचा एक वेगळा पैलू निर्माण केला आहे. सध्या तो ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.