सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने त्याच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्याने नवीन घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. प्रसादने मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत त्याने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. प्रसाद ओक व मंजिरी ओक यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या नव्या घरी वास्तुशांतीची पूजा ठेवण्यात आली होती. (Prasad Oak On CM Eknath Shinde)
प्रसादच नवं घर सध्या विशेष चर्चेत आलं आहे. प्रसादने घेतलेल्या नव्या घरात त्याने जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रण दिलं होतं. यावेळी सिनेसृष्टीतील अभिनेता मंगेश देसाई याने कुटुंबासह हजेरी लावलेली पाहायला मिळाली. याशिवाय एका खास व्यक्तीलाही आमंत्रण देण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसादच्या नव्या घरी आमंत्रित करण्यात आले होते. प्रसादच्या शब्दाचा मान ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओक कुटुंबियांना शुभेच्छा देण्यास हजेरी लावली.
या भेटीनंतर प्रसादने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मनात एक पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने पोस्ट शेअर करत, “मुख्यमंत्री साहेब.माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देत तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्याबरोबर बसलात, जेवलात, नीट निरखून संपूर्ण घर पाहिलंत. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे” असंही तो म्हणाला.
यापुढे लिहीत त्याने, “आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने ‘माणूस’ जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करत आहात असंच वाटलं” असं म्हणत ओक कुटुंबियांकडून त्यांचे आभार मानले आहेत. जाता जाता एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत बिल्डिंगच्या सोसायटीवरील पाटीवर ‘हार्दिक शुभेच्छा’ म्हणत सही देखील केली.