सध्या मराठीमध्ये ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रिमियरला मराठीतील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी नम्रता संभेराव तिच्या कुटुंबियांसह हजर होती. यावेळी नम्रताच्या कुटुंबियांनी तिचं भरभरुन कौतुक केलं. तिच्या सासूबाईंनाही सूनेचा अभिमान वाटला. यावेळी कुटुंबाचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून नम्रताला अश्रू अनावर झाले. (Namrata Sambherao Interview)
‘इट्स मज्जाला’ दिलेल्या मुलाखतीत नम्रता अगदी खुलेपणाने व्यक्त झाली. नम्रताला मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर तिच्या आईने तिचं तोंडभरुन कौतुक केलं. नम्रताची आई म्हणाली, “मुख्य भूमिका असलेला तिचा पहिलाच चित्रपट आहे. आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्हाला नम्रताचा अभिमान आहे”. त्याचबरोबरीने नम्रताच्या सासूबाईंनीही ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहण्यासारखा होता. सासूबाईंनी सूनेच्या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक करत तिला शाबासकी दिली.
नम्रताच्या सासूबाई म्हणाल्या, “नम्रताचा चित्रपट अगदी छान आहे. विशेष म्हणजे सासू-सूनेपेक्षा मुलगी व आई म्हणून आमचं नातं अधिक चांगलं आहे”. नम्रताबाबत बोलताना तिच्या सासूबाई अगदी भावुक झाल्या. तसेच नम्रताच्या वडिलांनीही तिचं कौतुक केलं. “नम्रताचा चित्रपट कसा वाटला?” असं विचारण्यात आल्यावर तिचे वडील म्हणाले, “चित्रपट एकदम मस्त आहे. खूप छान वाटलं. मला माझ्या मुलीची अभिमान आहे”.
त्याचबरोबरीने नम्रताचा पती योगेशनेही चित्रपटातील तिच्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुक केलं. कुटुंबाने केलेलं कौतुक ऐकून नम्रताला रडू कोसळलं. नम्रता म्हणाली, “माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. कारण पहिल्यांदाच कुटुंबातील सगळे चित्रपटाच्या प्रिमियरला आले आहेत. मी आतापर्यंत हेच म्हणत आले आहे की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण मुख्य भूमिका असलेला माझा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट माझ्या कुटुंबाबरोबर मला बघायला मिळतो ही माझ्या खूप आनंदाची गोष्ट आहे”. नम्रता रडत असताना तिच्या सासूबाईंना तिला प्रेमळ आधर दिला. एकंदरीत नम्रताची प्रगती आणि आनंद पाहून कुटुंबियांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य पाहायला मिळालं.