छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकरने अनेक नाटक व मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनय क्षेत्रात वावरताना त्याने अनेक विनोदी स्किट्स आणि नाटकांचे लेखनदेखील केलेलं आहे. मात्र, आता तो स्वतः दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट घेऊन येत आहे. ‘एकदा येऊन तर बघा-रिटर्न जाणार नाही !’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, ज्याचा टीझर नुकताच समोर आला आहे. (Ekda Yeun tar Bagha teaser out)
‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा टीझर १ मिनिटाचा आहे. ज्यामध्ये गिरीश कुलकर्णी त्यांच्या कुटुंबीयांची व नव्याकोऱ्या हॉटेलची ओळख करताना दिसतात. पुढे, तिथे एका अतरंगी पाहुण्याची एन्ट्री झाल्यावर त्या हॉटेलमध्ये काय काय बदल घडतो, हे प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या टीझरमध्ये पात्रांची नावे उघड करण्यात आली नाही. पण अभिनेत्री तेजस्विनी पंडित गिरीश कुलकर्णींची ऑनस्क्रीन पत्नी असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे. ओंकार भोजने व प्रसाद खांडेकर त्यांच्या भावाच्या, तर तेजस्विनी नम्रताच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता ओंकार भोजने या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
हे देखील वाचा – Video : “बाबा तू इथून जा ना”, स्वप्निल जोशी सेटवर येताच असं का म्हणाला प्रसाद ओक?, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण…
अभिनेते सयाजी शिंदे, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, शशिकांत केरकर, सुशील इनामदार अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शिवाय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित माने व वनिता खरात हेदेखील यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन खुद्द प्रसादने केलं आहे. तर कथा पारितोष पेंटर यांची आहे. रोहन रोहन व कश्यप सोमपुरा यांनी संगीत दिलं आहे. तर पारितोष पेंटर, दीपक कृष्ण चौधरी, राजेश मोहंती हे या चित्रपटाचे निर्माते आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.