‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोडीची सर्वाधिक चर्चा रंगली. प्रसाद व अमृतामध्ये असणारं प्रेमाचं नातं प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलं. ‘बिग बॉस’नंतरही प्रसाद व अमृताची मैत्री कायम राहिली. इतकंच नव्हे तर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांपूर्वी साखरपुडा करत प्रसाद व अमृताने चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता दोघांची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या प्रसाद व अमृताच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रसाद व अमृताने त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांनीही घेतलेला उखाणा विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच दोघांच्याही पारंपरिक लूकचं त्यांचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. अमृताच्या आजोबांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. याबाबतच तिने पोस्ट शेअर केली आहे.
अमृता म्हणाली, “आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७व्या वर्षी सगळं प्लॅनिंग करुन भेटवस्तु, बुके या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरुवात केली. एवढं सगळं झाल्यावर मग उखाणा घ्या या आग्रहाला नाकारणार कसं?”. कुटुंबियांच्या आग्रहाखातर अमृता व प्रसादने एकमेकांसाठी खास उखाणा घेतला. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसाद रावांचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलंच केळवण” असा उखाणा अमृताने घेतला. तर “कितीही वणवण फिरलीस तकी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी” असा प्रसादने उखाणा घेतला. उखाणा घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना भरवलं. या व्हिडीओनंतर चाहत्यांनी प्रसाद व अमृताला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.