Bhagyashree Nhavale Periods Awareness : मासिक पाळीत प्रत्येक स्त्रीची चांगलीच तारांबळ उडते. बरेचदा पोटदुखी, अंगदुखी अशा नसत्या दुखण्यांचा सामना करावा लागतो. आणि या त्रासातून ती स्त्री घरच काम, ऑफिसचं काम सगळं सगळं करते. त्रास होतोय, आराम हवा हे माहित जरी असलं तरी प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आरामाच सुख येईल असं नाही. आजवर अनेकांनी मासिक पाळीबाबत भाष्य केलं आहे. बऱ्याच अभिनेत्रींनींही त्या याकडे कसं पाहतात, त्यांना काय वाटतं याबाबत बोललं आहे. अशातच सध्या एका अभिनेत्रीने मासिक पाळीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘कुंकू टिकली टॅटू’ फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हलवेने याबाबत भाष्य केलं आहे.
भाग्यश्रीने नुकतीच मज्जा पिंकच्या मनातला देव या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने पिरेड्सच्या वेळी बाजूला बसण्याच्या प्रथेवर भाष्य केलं. ती म्हणाली, “आमच्या घरात सुद्धा लहानपणापासून ते आजपर्यंत मासिक पाळी आल्यावर मी बाजूला बसत आलीय. माझी आजी म्हणायची की, या काळात बाजूला बसणं म्हणजे स्त्रीयांसाठी शाप नव्हे. बाजूला बसणे हा एक आराम आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कुठल्या दृष्टिकोनाने बघतो तेवढेच महत्त्वाचं असतं. मला अजिबात त्याची लाज वाटत नाही किंवा असंही वाटत नाही की आपल्यालाच का वेगळं बसवतात. माझ्यामते आपण चार दिवस ब्रेक घेऊन बघावा. चार दिवस आराम करून बघा, चार दिवस स्वतःला वेळ देऊन बघा, चार दिवस फक्त नामस्मरण करून बघा, पेंटिंग करून बघा, पुस्तक वाचा, निवांत बसून बघा काय हरकत आहे, हे माझं म्हणणं आहे पण मी ते कोणावर थोपवणार नाही”.
पुढे ती म्हणाली, “मी आता माझ्या सासरी बाजूला बसते. त्यांचं काहीच म्हणणं नाही.त्यांच्या घरीसुद्धा ही पद्धत आहे. त्यांना माझा बाजूला बसण्याच काहीच ऑब्जेक्शन नाही. मी या वेळेत मस्त बाजूला बसते, खाते-पिते, खूप झोपते त्यामुळे खूप हेल्दीसुद्धा असते. तुम्ही देवाला जाणं न जाणं हा वेगळा प्रश्न आहे पण तुम्ही तुमच्या घरी आराम करून बघा”.
आणखी वाचा –शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”
शेवटी या सगळ्यामुळे आजच्या मुलींमधील प्रॉब्लेम्स पाहून ती म्हणाली, “आज मुलींमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत. इनफर्टिलिटी, पीसीओडी यांसारखे प्रॉब्लेम आहेत ते का आहेत कारण आपण खूप एकमेकांची बरोबरी करायला जातो. मुली मुलांपेक्षा श्रेष्ठ आहे हे देवाने आधीच दाखवून दिलं आहे. जेव्हा जेव्हा देवांना गरज पडली आहे तेव्हा त्यांनी देवींची मदत घेतली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा ब्रेक घ्या, छान फिरायला जा, हवं ते करा”.





