दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या ‘सालार’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. खरंतर हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता निर्मात्यांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची मात्र निर्मात्यांनी अदयाप काही माहिती दिली नाही. त्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (Salaar movie release Postponed)
‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर प्रभासच्या पुढच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी जादू केली नाही. त्यातच काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता अभिनेत्याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचे दिग्दर्शन ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील करत आहे.
निर्मात्यांनी सुरुवातीला हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून तशी घोषणा निर्मात्यांच्या वतीने करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे, “‘सालार’साठी तुमच्या उत्सुकतेचा आम्ही आदर करतो. पण २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा चित्रपट काही अनपेक्षित परिस्थितीमुळे आम्ही हा पुढे ढकलत आहोत. कृपया समजून घ्या की, हा निर्णय सावधगिरीने घेण्यात आला आहे. कारण आम्हाला एक विलक्षण सिनेमाचा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी आमची टीम आपले उत्तम देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”
हे देखील वाचा – “एक स्वप्न पूर्ण…” महेश मांजरेकरांसाठी भूषण प्रधानची खास पोस्ट, म्हणाला, “प्रत्येक दिवशी मी…”
दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत माहिती देताना निर्माते यात म्हणतात, “आम्ही योग्य वेळ आल्यावर प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली जाईल. तोपर्यंत चित्रपटाला अंतिम रूप देत असताना आमच्यासोबत रहा”, असे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात काम करताना दिसणार गौरव मोरे, चित्रपटाचं नावही बदललं कारण…
प्रभासचा हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून ज्याचा पहिला भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात प्रभाससह श्रुती हसन, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, टिनू आनंद, ईश्वरी राव व अन्य कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदीसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.